मुंबई : देशात भाजपने एकहाती सत्ता काबीज करताना काँग्रेसची पूरती धुळधाण केली तरीही सहा राज्यांत भाजपला एकही जागा मिळवता आलेली नाही, हे विशेष. तसेच एका राज्यात भाजपला एक टक्का मते मिळालेली नाहीत. भाजपपुढे काँग्रेसचा टिकाव लागलेला नाही. काँग्रेसला १७ राज्यांत चक्क भोपळाही फोडता आलेला नाही. आधीच पराभव आणि १७ राज्यांत एकही जागा न मिळाल्याने काँग्रेसची चिंता अधिक वाढली आहे.
देशात सात टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे जवळपास दोन महिने राजकीय रणधुमाळी पाहायला मिळाली. प्रचारात काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर जोरदार चिखलफेक केली. प्रचारात एकदम टोकाची भूमिका राजकीय नेत्यांची पाहायला मिळाली. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारताना काँग्रेसला जोरदार दे धक्का दिला. पुन्हा एकदा देशात मोदी राज पाहायला मिळणार आहे. मोदींच्या डंका एवढा असल्याने तब्बल १७ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.
दरम्यान, देशात एकहाती सत्ता मिळवूनही भाजपची दक्षिणेत कर्नाटक वगळताम मोठी धुळधाण उडाली. भाजपलाही सहा राज्यांमध्ये भोपळा वाट्याला आला. यात आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, मेघालय, मिझोराम, सिक्कीम या राज्यांत भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही. तसेच आंध्रमध्ये भाजपला एक टक्काही मते मिळालेली नाहीत.
काँग्रेसला आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, मणिपूर, मिझोराम, ओडिशा, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण दिव आणि लक्षद्वीप या ठिकाणी खातेही खोलता आलेले नाही.