नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 च्या पहिल्या चरणाचे मतदान 11 एप्रिलला होणार आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. जर देश एक आहे तर सर्वांनाही एक व्हायला हवे. इथे समाजातील प्रत्येक वर्गासाठी जागा हवी. पण पंतप्रधान मोदी यांना भारतात केवळ श्रीमंतच दिसत असून ते त्यांच्यासाठीच स्वप्न पाहत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक सभेत सर्वांना मोठमोठी आश्वासने देतात. कधी कोणाच्या खात्यात 15 लाख तर कधी 2 कोटी लोकांना रोजगार देण्याबद्दल बोलतात. गरीबांना ताकदवान बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जे शब्द दिले ते कधी पूर्णच झाले नाहीत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तर युपीए सरकारने 14 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढल्याचेही ते म्हणाले.
पीएम मोदी हे चौकीदार आहेत पण गरीबांचे नाहीत तर अनिल अंबानींचे चौकीदार आहेत असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उद्योगपतींचे साढे तीन लाख कोटी रुपये माफ केले. गेल्या पाच वर्षात गरीब केवळ गरीबच झाले. आम्ही शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या हिताचे काम केल्याचे पंतप्रधान मोदी सांगतात. पण पाच गेल्या पाच वर्षात जे काही झाले त्यावरून देशातील सामान्यांना काय मिळाले हे तुम्हालाही समजेल असेही राहुल म्हणाले. देशाच्या विविध भागातील दलित समाज आणि अल्पसंख्यांकासोबत काय झाले हे देखील तुम्हाला माहीत असेल असेही ते म्हणाले.
जर विरोधी नेत्यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला तर ते त्यांना देशद्रोही ठरवतात. देशाच्या विकासात बाधा आणल्याचा ठपका त्यांच्यावर लावला जातो. एवढंच नव्हे सरकारला तुम्ही सल्ला देखील देऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी एक विचारधारा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा परिणाम देखील तुम्ही सर्वांनी पाहीला असेल असेही राहुल गांधी यांनी म्हटले.