नवी दिल्ली : loksabha election 2019 लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनय विश्वाकडून राजकारणाकडे वळणाऱ्या अभिनेता सनी देओलची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सनीविषयीचं आपलं मत आणि त्याच्या विचारांनी भारावल्याची भावना व्यक्त केली. सनीची विनम्रता आणि एका चांगल्या भारतासाठीचा त्याचा दृष्टीकोन, जिद्द आणि चिकाटी हे गुण आपल्याला भावल्याचं मत त्यांनी मांडलं.
सनीची भेट घेतल्याचा आनंद व्यक्त करत येत्या काळात भाजप गुरदासपूर मतदार संघात ऐतिहासिक कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त केली. 'हिंदुस्तान जिंदाबाद था, है और रहेगा' या 'गदर' चित्रपटातील संवादावर आम्हा दोघांचंही एकमत झाल्याचं मोदींनी ट्विट करत म्हटलं.
'सनी देओलमधील कोणती एक गोष्ट मला भावली असेल, तर ती म्हणजे त्याची विनम्रता आणि चांगल्या, प्रगत भारतासाठीची त्याची जिद्द. त्याला भेटण्याचा मला आनंदच आहे', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.
What struck me about @iamsunnydeol is his humility and deep passion for a better India.
Happy to have met him today. We are all rooting for his victory in Gurdaspur!
We both agree- हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा! pic.twitter.com/o4tcvITy2e
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 28, 2019
काही दिवसांपूर्वीच सनी देओलने भाजपामध्ये प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. निर्मला सीतारमण, पियुष गोयल कॅप्टन अभिमन्यू आणि इतरही काही भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्याने पक्षप्रवेश केला होता. पंजाबच्या गुरदासपूर येथील मतदार संघातून तो भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. देशाच्या हितासाठी आपल्याला काम करण्याची इच्छा असल्याचं सनी देओलने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता राजकारणात प्रवेश करणारा हा अभिनेता विरोधी पक्षनेत्यांना कितपत 'घातक' ठरतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.