दक्षिणेत राहुल गांधींनी का केली 'वायनाड'चीच निवड?

काय आहेत 'वायनाड'ची गणितं? पाहुयात... 

Updated: Apr 1, 2019, 04:18 PM IST
दक्षिणेत राहुल गांधींनी का केली 'वायनाड'चीच निवड?  title=

नवी दिल्ली : राहुल गांधींसाठी दक्षिणेतला सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ कोणता? याची चाचपणी करण्यात आली. त्यावेळी नाव पुढे आलं ते 'वायनाड'... काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राहुल गांधी वायनाड या मतदारसंघातून निवडणूक लढणार ही बातमी समोर आल्यानंतर केरळमधलं अत्यंत शांत सुंदर असलेलं वायनाड अचानक तापू लागलं.

वायनाडची निवड का?

२००८ मध्ये तयार झालेला हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत एम. आय. शाहनवास १ लाख ५३ हजारांनी निवडून आले होते. २०१४ मध्येही शाहनवासच निवडून आले... पण मताधिक्य २० हजारांवर आलं होतं. नोव्हेंबर २०१८ मध्ये शाहनवास यांचं निधन झालं. राहुल गांधींसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ म्हणून वायनाडचं नाव सुचवण्यात आलं... 

वायनाड हा कर्नाटक, तामिळनाडूला जोडणाऱ्या उत्तर केरळच्या सीमाभागात आहे... त्यामुळे या तीन राज्यांतल्या मिळून ८७ मतदारसंघांमध्ये राहुल गांधींच्या उमेदवारीचा प्रभाव पडेल, अशी काँग्रेसला आशा आहे.

वायनाडमधला मुस्लिम फॅक्टर...

वायनाड या मतदारसंघात हिंदू ४९.४८ %, मुस्लीम २८.६५ % तर ख्रिश्चन २१.३४ % आहेत. मुस्लीम लीगचा या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे. मुस्लीम लीगनं राहुल गांधींच्या उमेदवारीचं स्वागत केलंय. पंतप्रधान मोदींनी मात्र हाच धागा पकडत राहुल गांधींवर टीका केलीय.

राहुल गांधींचा पराभव करणारच, असा विडा केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी उचललाय. राहुल गांधींनी भाजपाचा तगडा उमेदवार असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, राहुल गांधींनी ही डाव्यांशी थेट लढा पुकारल्याचं माकपनं म्हटलंय.

अशी होणार लढत...

राहुल गांधी यांच्यासमोर डाव्या आघाडीचे पी. पी. सुनीर यांचं आव्हान आहे... तर भाजपानं ही जागा मित्रपक्ष भारत धर्म जनसेना अर्थात बीडीजेएसला दिलीय. 

याआधी इंदिरा गांधींनी १९८० साली उत्तर प्रदेशातल्या बरेलीमधून आणि आंध्र प्रदेशातल्या 'मेडक'मधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्या विजयी झाल्या होत्या तर १९९९ मध्ये सोनिया गांधींनी उत्तर प्रदेशातल्या अमेठीतून आणि कर्नाटकाच्या बेल्लारीमधून निवडणूक लढवली होती. त्याही दोन्ही ठिकाणी विजयी झाल्या होत्या. आता निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण अशी टोकं सांधणारे राहुल गांधी हे गांधी घराण्यातले तिसरे उमेदवार ठरलेत.