Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्यांमध्ये पाचव्या टप्प्यात अनेक मोठ्या मतदारसंघांसाठीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. राज्य पातळीवरील लढतींसोबतच देश स्तरावरील लढतीसुद्धा (5th Phase of voting) पाचव्या टप्प्याचं प्रमुख आकर्षण असणार आहे. याच पाचव्या टप्प्यामध्ये अर्थात 20 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी महत्त्वाच्या मतदारसंघांतून काँग्रेसकडून अद्यापही उमेदवार निश्चित करण्यात आला नव्हता. रायबरेली, अमेठी या मतदारसंघांचं चित्रंही अस्पष्ट होतं. पण, आता मात्र इथंही चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
उबलब्ध माहितीनुसार रायबरेली आणि अमेठीच्या जागेसंदर्भातील वृत्त अखेर समोर आलं असून, काँग्रेसकडून राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर, अमेठीतून के.एल शर्मा काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसच्याच वतीनं यासंदर्भातील माहिती एका अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली. यापूर्वी सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढायच्या, मात्र आता त्या राज्यसभेवर गेल्यानं राहुल गांधी रायबरेलीतून लढणार आहेत.
'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए श्री @RahulGandhi को उत्तर प्रदेश के रायबरेली से और श्री किशोरी लाल शर्मा को अमेठी से कांग्रेस उम्मीदवार घोषित किया गया है। pic.twitter.com/AyFIxI62XH
— Congress (@INCIndia) May 3, 2024
शुक्रवारी राहुल गांधी शक्तिप्रदर्शन करत रायबरेलीतून अर्ज भरणार आहेत, तर के एल शर्मा अमेठीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. के.एल शर्मा यांची लढत भाजपाच्या स्मृती इराणीं यांच्यासोबत होणार आहे.
सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यामुळं आता रायबरेलीसाठी काँग्रेसची जागा जबाबदार व्यक्तीकडे सोपवणं गरजेचं होतं. 2004 ते 2024 या काळात सोनिया गांधी यांनी या मतदारसंघाचं नेतृत्वं केलं. मोदींचा प्रभाव असूनही त्यांनी या मतदारसंघावरील पकड भक्कम ठेवली होती. रायबरेलीची जनता यंदाच्या निवडणुकीमध्ये गांधी कुटुंबाची निराशा होऊ देणार नाही, याच आत्मविश्वासापोटी इथं राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात आली.
अमेठीच्या बाबतीत सांगावं तर, मागील 5 वर्षांपासून राहुल गांधी यांनी त्यांचा मोर्चा वायनाडकडे अधिक वळवला असून, अमेठीपासून त्यांनी अप्रत्यक्ष दुरावा ठेवला होता. त्यातच इथून त्यांनी निवडणूक लढवणं काही अंशी पक्षासाठी धोक्याचं ठरत होतं असं तज्ज्ञांचं मत. ज्यामुळं राहुल गांधी यांच्या रायबरेलीतील उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.