Robbed during the road show: देशभरात लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांचे नेते मोठ मोठ्या रॅली घेऊन मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. आपल्या नेत्याला प्रोत्साहन देण्यासाठी हजार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. जवळजवळ सर्वच मतदार संघात हे चित्र दिसतंय. दरम्यान मोठ मोठ्या निवडणूक रॅलीमध्ये कार्यकर्त्यांसोबत खिसेकापूदेखील घुसू लागले आहेत. निवडणूक प्रचार म्हटलं की रॅलीमध्ये सर्वात पुढे उमेदवार, त्याच्यासोबत सेलिब्रिटी किंवा पक्षाचे ज्येष्ठ नेते, पाठीमागे हजारो कार्यकर्ते...अशी रॅली तुम्ही पाहिली असेल. पण यासोबत खिसेकापूदेखील मोठ्या प्रमाणात असतात, असं कोणी सांगितलं तर? हो..हे खरंय. मेरठमध्ये भाजप उमेदवार अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये खिसेकापूंनी मोठी कमाई केलीय.
रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिटमार घुसले होते. त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले आणि मिळेल त्याचे खिसे कापायला सुरुवात केली. यामुळे भरल्या खिशाने आलेल्या अनेकांना हात हलवत परत जावे लागले.
भाजप उमेदवार अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ज्यामध्ये रामायण मालिकेतील लक्ष्मण सुनील लहर आणि सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया हे सेलिब्रिटी रोड शोमध्ये उपस्थित होते. त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. यासोबतत मीडियाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. दरम्यान भर रॅलीमध्ये लोकांचे आणि मीडिया कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन आणि पॉकेटवर चोरट्यांनी डल्ला मारला.
रोड शो दरम्यान सुमारे दोन डझन मोबाईल फोन गायब झाले आहेत. महिलांची पर्स आणि मीडिया कर्मचाऱ्यांची पाकिटेही गायब झाली. प्रत्येकजण आपल्या कामात धावपळीत असल्याचे चोरट्यांनी हेरले आणि संधीचा फायदा घेतला. हे कोण्या एकट्या चोराचे काम नसल्याचे चोरीच्या आवाक्यावरुन लक्षात येत आहे.
सोमवारी भाजपचे उमेदवार अरुण गोविल यांचा रोड शो झाला. ज्यामध्ये लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीमध्ये खिसे चोरणारी टोळीदेखील घुसली होती. रॅलीला सुरुवात झाली. हळुहळू गर्दी वाढू लागली. छोट्या-मोठ्या रस्त्याने मार्ग काढत रॅली पुढे जाऊ लागली. तसेच रॅलीत घुसलेले चोरटे अलर्ट झाले. चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल आणि पर्स पळवून नेल्या.
रोड शो दरम्यान साधारण 24 मोबाईल, महिलांची पर्स आणि कार्यकर्त्यांची पाकिटेही गायब झाली. थोड्या वेळाने सर्वांच्या हा प्रकार लक्षात आला पण तोपर्यंत उशीर झाला होता. चोरटे आपली कामगिरी फत्ते करुन पसार झाले होते.
यानंतर पीडित महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. चोरट्यांच्या टोळीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेने टोळीतील दोन चोरांना पकडल्याचे वृत्त समोर आले आहे. या दोघांची कसून चौकशी केली जात आहे.