Narayan Rane Vs Vinayak Raut: राज्यातील एकएका लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटतोय. पण कोकणातील तिढा सुटायला फारच वेळ लागला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंतर हे इच्छुक होते. पण महायुतीने भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या बाजुने कौल दिला. आणि किरण सामंत यांना आपली तलवार म्यान करावी लागली. महाविकास आघाडीकडून लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांच्याशी नारायण राणे यांची लढत आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोघांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यामध्ये निवडणूक आयोगाकडे त्यांनी स्वत:ची माहिती दिली. दरम्यान नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये सर्वात जास्त कोण शिकलंय? सर्वात जास्त संपत्ती कोणाकडे आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही ना. चला तर मग जाणून घेऊया.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तोडीस तोड उत्तर देणाऱ्या नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात मशाल विरुद्ध कमळ अशी लढाई होणार आहेत. नारायण राणेंना राजकारणाचा प्रदिर्घ असा अनुभव आहे. त्यांनी कार्यकर्ता, नगरसेक, आमदार, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा मोठा प्रवास केलाय. माजी कट्टर शिवसैनिक असल्याने त्यांना शिवसेनेची पालेमुळे माहिती आहेत. दरम्यान नारायण राणेंच्या शिक्षण आणि संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
नारायण राणे यांनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती उपलब्ध आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांनी मुंबईतून आपले शालेय पूर्ण केले. १९७० मध्ये घाटकोपर शिक्षण प्रसारक मंडळ रत्नशाळेत ते शिकले. तेथे अकरावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. तो काळ शिवसेनेच्या उभारीचा काळ होता. बाळासाहेबांच्या भाषणाने ते प्रेरित होते. त्यामुळे तरुण वयापासूनच त्यांनी शिवसेनेचे काम करायला सुरुवात केली. राज्यसभा उमेदवारीवेळी भरलेल्या माहितीत अकरावीपर्यंच्या शिक्षणाचा उल्लेख आहे. शिक्षणाविषयी याहून अधिक माहिती उपलब्ध नाही.
दरम्यान नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज करताना आपल्या संपत्तीबाबत खुलासा केला आहे. त्यानुसार त्यांच्याकडे 137 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. यामुळे नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या संपत्तीचा तपशील जाणून घेऊया. नारायण राणे यांच्याकडे 35 कोटी इतकी वैयक्तिक मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी निलम राणे यांच्याकडे 75 कोटी इतकी संपत्ती आहे. कोट्यावधी संपत्ती असलेले राणे कुटुंबीय कर्जाच्या ओझ्याखाली देखील आहे. माहितीपत्रानुसार राणे कुटुंबीयांवर 28 कोटीहून अधिक कर्ज आहे.
नारायण राणे यांच्याकडे 1 कोटी 76 लाख 96 हजार 536 रुपयांचे 2552.25 ग्रॅम सोने आहे. त्यांच्याकडे 78 लाख 85 हजार 371 रुपये किंमतीचे हिरे आहेत. तर राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्याकडेही 1 कोटी 31 लाख 37 हजार 867 रुपयांचे 1819.90 ग्रॅमचे सोने आहे. नीलम राणे यांच्याकडे 15 लाख 38 हजार 572 रुपयांचे हिरे आणि 9 लाख 31 हजार 200 रुपयांची चांदी आहे. अशाप्रकारे नारायण राणे आणि कुटुंबाकडे एकूण 9 कोटी 31 लाख 66 हजार 631 रुपयांचे सोने. चांदी हिरे असा ऐवज आहे. राणे कुटुंबीय हे व्यावसाय क्षेत्रात आहे. कोकण, मुंबई, पुणे याठिकाणी त्यांची प्रॉपर्टी आहे. वेंगुर्ला, पनवेल, कुडाळ आणि कणकवलीच्या जानवलीत राणेंची जमिन आहे. कणकवलीत राणेंचा अलिशान बंगला आहे. नीलम राणे यांच्याकडे जानवली, मालवण आणि पनवेलमध्ये गाळे आहेत. मुंबईत नारायण राणे यांचा फ्लॅट आहे. दरम्यान मागच्या 6 वर्षात नारायण राणेंच्या संपत्ती तब्बल 49 कोटीने वाढ झाल्याची बाब समोर आली आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत हे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. पुणे बोर्डातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. 1992 मध्ये विकास रात्र विद्यालयातून ते बीए झाले. यानंतर पुण्यातील टिळक विद्यापीठातून मे 2000 मध्ये त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये एमए केले. तसेच मुंबई विद्यापीठात पॉलिटिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे 6 कोटी 46 लाखांची संपत्ती असल्याचं आढळून आलं आहे. विनायक राऊत यांच्याकडे 4 कोटी 25 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. राऊत यांच्यावर 20 लाख 97 हजाराचे कर्ज असल्याचं प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झालं आहे. विनयाक राऊत यांच्याकडे एकूण 4 कोटी 90 लाख 34 हजार 829 रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची पत्नी शामल विनायक राऊत यांच्याकडे 16 लाख 73 हजार रुपये इतकी मालमत्ता आहे. 2019 च्या निवडणुकीवेळी त्यांनी ही माहिती जाहीर केली होती. आधीच्या मालमत्तेपेक्षा त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेत 71 लाख 47 हजारने वाढ झाली होती. आधीच्या निवडणुकीवेळी त्यांच्यावर 28 लाखांचे कर्ज होते तर 2019 च्या निवडणुकीवेळी 20 लाख 97 हजार 100 रुपये इतके कर्ज होते. राऊतांच्या संपत्तीबद्दल 2024 ची अपडेटेड माहिती समोर येणे बाकी आहे.