LokSabha Election Result : जिथं रामाच्या पाऊलखुणा, तिथं भाजपला 'वनवास'

LokSabha Election Result : प्रभू श्रीरामाच्या नावावर भाजपने गेली 4 दशकं राजकारण केलं. त्याच रामाच्या पाऊलखुणा असलेल्या जागेवर भाजपला येत्या पाच वर्षाचा वनवास भोगावा लागणार आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jun 6, 2024, 11:56 PM IST
LokSabha Election Result : जिथं रामाच्या पाऊलखुणा, तिथं भाजपला 'वनवास' title=
LokSabha Election Result BJP

LokSabha Election Result : लोकसभा निवडणुकीच्या बरोबर 3 महिने आधी अयोध्येत राम मंदिराचं भव्य उद्घाटन पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची मूर्ती मंदिरात विराजमान झाली. राममंदिराचं श्रेय घेऊन अवघ्या देशातलं वातावरण राममय करण्याचा प्रयत्न भाजपनं केला. मात्र राममंदिराचा मुद्दा भाजपला स्वबळावर सत्तेच्या सिंहासनावर बसवू शकला नाही. एवढंच कशाला ज्या अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आलं, तिथंच भाजपचा दारूण पराभव झाला. फैजाबाद मतदारसंघात समाजवादी पार्टीच्या अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंह यांना हरवलं.

केवळ अयोध्याच नाही तर देशभरात जिथं-जिथं प्रभू श्रीरामाच्या पाऊलखुणा आहेत, तिथं भाजप उमेदवारांना मतदारांनी वनवासात पाठवलं. श्रीराम वनवासात असताना चित्रकूटला राम आणि भरताची भेट झाल्याचं सांगितलं जातं. त्याच चित्रकूटमध्ये अर्थात बांदा मतदारसंघात सपाच्या उमेदवार कृष्णा पटेल यांनी भाजपच्या आरके सिंह यांचा पराभव केला.

१४ वर्षांच्या वनवासात श्रीराम आणि सीतामाईचं वास्तव्य होतं ते दंडकारण्यात... अर्थात आताच नाशिक पंचवटी... याच ठिकाणी भगवान लक्ष्मणानं 'शूर्पणखेचं' नाक कापलं. त्यामुळे या शहराला “नाशिक” असं नाव पडल्याची आख्यायिका आहे. नाशिकमध्येच महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंचंही नाक मतदारांनी कापलं आणि शिवसेना ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंच्या बाजूनं कौल दिला.

रामटेक... प्रभू श्रीरामांनी वनवासादरम्यान इथं विश्रांती घेतल्यानं रामटेक नाव पडल्याचं सांगितलं जातं. रामटेकमध्ये महायुतीला यश मिळवता आलं नाही. काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी महायुतीचे उमेदवार राजू पारवेंचा पाडाव केला.

रामेश्वरम.. रामायणातील प्रसिद्ध राम सेतूचं निर्माण इथं करण्यात आलं होतं. इथंही रामनाथपूरममधून चक्क मुस्लीम लिगचा उमेदवार विजयी झालाय. त्यामुळं ज्या प्रभू श्रीरामांच्या नावावरून भाजपनं वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वच ठिकाणी भाजपला राम पावला नाही, हेच दिसून येतंय.