LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) भाजपा 2019 च्या तुलनेत चांगली कामगिरी करेल असं मत प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक सुरजित भल्ला (Surjit Bhalla) यांनी मांडलं आहे. भाजपा 2019 च्या तुलनेत जास्त जागा जिंकेल असं ते म्हणाले आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सुरजित भल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लक्ष लोकसभा निडणुकीत 330 ते 350 जागा जिंकू शकतो असं भाकीत मांडलं आहे.
"संख्याबळ पाहता भाजपा स्वत: 330 ते 350 जागा जिंकू शकतं. पण या फक्त भाजपा पक्षाच्या जागा असतील. यामध्ये मित्रपक्षांना सहभागी करण्यात आलेलं नाही," असं सुरजित भल्ला यांनी सांगितलं आहे. 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जिंकलेल्या जागांमध्ये पाच ते सात टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. "ही एक लाट असणारी निवडणूक ठरु शकते. प्रत्येक निवडणुकीत तशी क्षमता असते. पण ही लाट नसणारी निवडणूक होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही," असं सुरजित भल्ला यांनी सांगितलं आहे.
सुरजित भल्ला यांच्या मते, काँग्रेस 44 जागा जिंकू शकतं. किंवा 2014 मधील निवडणुकीच्या तुलनेत जागांचा आकडा 2 टक्क्यांनी कमी होईल. "विरोधकांमधील मुख्य समस्या म्हणजे त्यांचं नेतृत्व आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अर्थव्यवस्था आणि त्यानंतर नेतृत्व असतं. आणि या दोन्ही गोष्टी भाजपाच्या बाजूने आहेत. जर विरोधी पक्षाने असा नेता निवडला असता ज्याच्याकडे लोकांना खेचण्याची क्षमता आहे किंवा पंतप्रधान मोदींच्या तुलनेत अर्धी तरी असती, तर ही थोडी चांगली स्पर्धा झाली असती," असं सुरजित भल्ला यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भाजपा तामिळनाडूतही किमान 5 जागा जिंकू शकतं असं सुरजित भल्ला म्हणाले आहेत. तामिळनाडूत भाजपाची जास्त पकड नाही. "जर भाजपाने तामिळनाडूत 5 किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. केरळमध्ये पक्ष एक किंवा दोन जागा जिंकू शकतं," असं सुरजित भल्ला यांनी सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दक्षिणेत भाजपाचा मतांचा टक्का वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यादरम्यानच सुरजित भल्ला यांचं हे भाकित समोर आलं आहे. मागील निवडणुकींच्या तुलनेत दक्षिणेत भाजपाला जास्त मतं मिळतील असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
Asianet News Network ला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, "तुम्ही तेलंगणा पहा, जिथे आमची मतांची टक्केवारी दुप्पट झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा दक्षिणेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. भाजपाचे सर्वाधिक खासदार आहेत. मला विश्वास आहे की 2024 मध्ये निवडणुकीच्या तुलनेत मतांची टक्केवारी आणि जागा वाढतील".