विधानसभेतील भाजपच्या पराभवाचा लोकसभेवर होणार असा परिणाम...

मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगढमध्ये तर गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती.

Updated: Dec 12, 2018, 12:08 PM IST
विधानसभेतील भाजपच्या पराभवाचा लोकसभेवर होणार असा परिणाम... title=

भोपाळ - मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तिन्ही मोठ्या राज्यांमध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगढमध्ये तर गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती. ती आता संपुष्टात आली आहे. राजस्थानमध्येही मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपर्यंत सातत्याने विविध निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसला या तिन्ही राज्यांतील निवडणुकीत यश मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर दिसेल, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. लोकसभेची पंचवार्षिक निवडणूक येत्या मे २०१९ मध्ये होणार आहे. त्यामुळे मतदारांचा हाच कल कायम राहिल्यास भाजपला गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत फटका बसण्याची शक्यता आहे.

एका माध्यमसंस्थेच्या अभ्यासानुसार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये मिळून लोकसभेच्या ६५ जागा आहेत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत म्हणजे २०१४ मध्ये भाजपला ६५ पैकी ६२ जागांवर यश मिळाले होते. पण सध्याचे प्रत्येक राज्यातील विधानसभेतील राजकीय पक्षाचे पक्षीय बलाबल बघितले तर त्यावरून या जागा ३१ पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. 

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यांत मिळून भाजपचे १८० जागांचे नुकसान झाले आहे. २०१३ मधील निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे ४८ टक्के इतके नुकसान झाले आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या विधानसभेच्या जागा वाढल्या आहेत. पक्षाला १६३ जागांचा फायदा झाला आहे. २०१३ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस एवढ्या जागा गमावल्या होत्या.