Madhya Pradesh New CM : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची कोणच्या गळ्यात पडणार याबाबत गेले काही दिवस सुरु असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. भाजप (BJP) आमदारांच्या बैठकीत मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मोहन यादव हे उज्जैन दक्षिणेतून निवडून आले होते. मोहन यादव हे संघाच्या जवळचे असल्याचं बोललं जातं. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. यावर सर्व आमदारांनी सरमती दर्शवली. मोहन यादव यांच्या निवडीने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
कोण आहेत मोहन यादव?
मोहन यादव हे उज्जैन दक्षिणेचे आमदार आहेत. शिवराज सिंह सरकारमध्ये ते उच्च शिक्षा मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत होते. मोहन यादव हे ओबीसी समाजातले आहेत. 2013 मध्ये ते पहिल्यांदा उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 2018 मध्ये पुन्हा एकदा जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. 2 जून 2020 मध्ये शिवराज सिंग चौहान सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं. त्यांच्याकडे उच्च शिक्षा मंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आला. 25 मार्च 1965 मध्ये जन्मलेले मोहन यादव यांनी विक्रम विद्यापिठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं.
दिल्लीची टीम मध्यप्रदेशमध्ये
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरु होती. शिवराज सिंग चौहान यांच्याशिवाय दोन ते तीन नावांची चर्चा होती. यासाठी भाजप श्रेष्ठींकडून एक शिष्टमंडळ भोपाळमध्ये पाठवण्यात आलं होतं. यात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, आशा लाकरा, के लक्ष्मण यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने सर्वात आधी शिवराज सिंग चौहान यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे शिष्टमंडळाच्या सातत्यने संपर्कात होते.
या नावांची होती चर्चा
भाजप पक्ष कार्यालयात आमदारांची बैठक सुरु असातना बाहेर प्रल्हाद पटेल आणि शिवराज सिंग चौहान यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरु केली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शिवराज सिंह चौहान यांच्याबरोबरच जोतिरादित्य सिंधिया, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेलआणि वीडी शर्मा यांच्या नावाची चर्चा होती. मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करण्याआधी प्रल्हाद पटेल यांच्या निवसस्थानाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
भाजपाला बहुमत
नुकत्याच पार पडलेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं. मतमोजणीआधी झालेल्या एक्झिट पोलमध्ये मध्यप्रदेशात भाजप आणि काँग्रेसध्ये चुरशीची लढत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण प्रत्यक्षात भाजपने काँग्रेसचा सुपडा साफ केला. मध्यप्रदेशमध्ये 230 जागांपैकी भाजपने 163 जागा पटकावल्या. तर कमलनाथ यांच्या चेहऱ्यावर लढणाऱ्या काँग्रेसला 66 जागांवर समाधान मानावं लागलं.