प्रयागराज : महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात या खास दिवसाचा उत्साह पाहायला मिळत आहे. भगवान शंकराची आराधना करण्याच्या या दिवशी देशभरातील विविध शंकर मंदिरांमध्ये सकाळपासूनच प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा महाशिवरात्रीचं हे पर्व अधिक महत्त्वपूर्ण ठरत आहे ते म्हणजे आजच्या दिवसामुळे. शंकराची उपासना करण्याचाच दिवस म्हणून अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या सोमवारच्याच दिवशी ही महाशिवरात्र आली आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या मनोकामना भक्तगण आराधनेच्या माध्यमातून ईश्वराचरणी अर्पण करणार आहे. महाशिवरात्रीचा हा दिवस आणखी एका कारणामुळे महत्त्वाचा आहे ते म्हणजे कुंभ मेळ्याच्या अखेरच्या दिवसामुळे. इलाहबाद अर्थात प्रयागराज येथे सुरू असणाऱ्या कुंभ मेळ्याची आज सांगता होणार आहे.
जवळपास ६० लाखांहून अधिक भाविक आजच्या दिवशी प्रयागरागमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या दिवसासाठी होणारी गर्दी पाहता प्रशासनाकडूनही काही खास व्यवस्था करण्यात आली आहे. 'महाशिवरात्रीच्या दिवशी कल्पवासमध्ये स्नान करत थेट शंकराच्या दिव्य शक्तींशीच स्वत:ला जोडता येतं. पुराणांमध्ये उल्लेख केल्यानुसार स्वर्गातही या दिवसाची प्रतिक्षा असते', अशी माहिती राम नाम बँकेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या गुंजन वर्षणी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेसी संवाद साधताना दिली. इतकच नव्हे तर, आजच्याच दिवशी भगवान शंकराचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्वं प्रत्येकालेखी फार वेगळं आणि तितकंच रंजक आहे.
१५ जानेवारीपासून सुरू झालेल्या कुंभ पर्वाचा आज शेवट होणार आहे. जवळपास २२ कोटींहून अधिक भक्तांनी गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगममध्ये स्नान करत यंदाच्या कुंभमध्ये श्रद्धासुमनं अर्पण केली.
हिंदू धर्मात कुंभ मेळ्याला अतिशय महत्त्व आहे. हा कुंभमेळा हरिद्वार, इलाहबाद, उज्जैन आणि नाशिकमध्य़े भरतो. जेथे देश-विदेशातून अनेक भाविकांची गर्दी पाहायला मिळते. कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा येतो. दोन कुंभमेळ्यामध्ये एक अर्धकुंभ देखील येतो. हिंदू धर्मानुसार अशी मान्यता आहे की, कुंभमेळ्यात पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास मनुष्य पापमुक्त होतो आणि मनुष्यला जन्म-पुनर्जन्म किंवा मृत्यू-मोक्ष प्राप्त होतो.