Mumbai Crime News: मुंबई पोलिसांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व्हाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. शहरातील एका इलेक्ट्रॉनिक्स सामान विकणाऱ्या दुकानांना या तरुणाने 12 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप केला जात आहे. या 28 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीचं नावं नागराजू बुदुमुरु असं आहे. मुंबईमध्ये या फसवणुकीसंदर्भातील तक्रार दाखल केल्यानंतर 2 महिन्यांनी आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यामधून नागराजूला पोलिसांनी अटक केली. बुदुमुरुने 60 कंपन्यांना 3 कोटींचा गंडा घातल्याचं तपासात समोर आलं आहे.
सायबर क्राइम युनिटच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी डिसेंबर महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री करणाऱ्या मोठ्या दुकानाच्या मॅनेजिंग डायरेक्टर ऑफिसमधील कर्मचाऱ्याला आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा स्वकीय सचिव असल्याचं सांगत गंड घातला. आपण आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे स्वकीय सचिव आहोत. मुख्यमंत्र्यांना कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरशी चर्चा करायची आहे असं या व्यक्तीने या कर्मचाऱ्याला सांगितलं. या कर्मचाऱ्याने लगेच आपल्या मॅनेजिंग डायरेक्टरचा मोबाईल नंबर या व्यक्तीला दिला.
या तरुणाने मॅनेजिंग डायरेक्टरला आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा स्वकीय सचिव असल्याचं सांगत चर्चा केली. एका क्रिकेटच्या किटच्या स्पॉन्सरशिपसाठी इलेक्ट्रॉनिक्स सामान विकाणाऱ्या दुकानांची चैन असलेल्या ब्रॅण्डकडे या व्यक्तीने 12 लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. या तरुणाने आंध्र प्रदेश क्रिकेट संघाच्या नावाने खोटी कागदपत्रं आणि ईमेल आयडीही या मॅनेजिंग डायरेक्टरला पाठवला. क्रिकेटपटूंच्या किटसाठी पैसे हवे आहेत असं सांगून या कंपनीकडून या तरुणाने 12 लाख रुपये घेतले.
आपली फसवणूक झाली आहे असं समजल्यानंतर या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम युनिटने तपास सुरु केला. यावेळी आरोपी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमा भागात असल्याचं समजलं. तपासादरम्यान मुंबई पोलिसांना या तरुणाविरोधात आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये अशाप्रकारच्या फसवणुकीचे एकूण 30 गुन्हे दाखल असल्याचं समजलं. या तरुणाने एकूण 3 कोटींहून अधिक रुपयांचा अपहार केल्याचं उघड झालं. अटक करण्यात आली त्यावेळी या तरुणाच्या खात्यावर 7 लाख 60 हजार रुपये होते असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणामध्ये तरुणाला अटक करण्यात आली असून त्याने या 60 कंपन्यांना कसा आणि कधी गंडा घातला यासंदर्भातील तपशील पोलिस शोधत आहेत.