मणिपूरमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, 10 वर्षांच्या मुलासमोरच केले होते अपहरण

Manipur Army Jawan: मणिपुरमधील हिंसाचार थांबता थांबत नाहीये. सुट्टीवर आलेल्या एका जवानाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 18, 2023, 06:52 AM IST
मणिपूरमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, 10 वर्षांच्या मुलासमोरच केले होते अपहरण title=
Manipur violence Army personnel killed by gun mans

Manipur Army Jawan: मणिपुरमध्ये भारतीय सैन्य दलातील जवानाचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा जवान सुट्टीवर आला होता. रविवारी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुनींगथेक गावात जवानाचा मृतदेह आढळला होता. तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. सीपॉय सेर्तो थांगथँग कोम असं या जवानाचे नाव असल्याचे समजते आहे. जवानाचे अपहरण करण्यात आले तेव्हा तिथे त्याचा मुलगाही तिथेच होता. मुलासमोरच जवानाचे अपहरण करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

सीपॉय सेर्तो थांगथँग हे भारतीय सैन्य दलाच्या डिफेन्स सिक्युरिटी कोर प्लाटूनमध्ये कांगपोक्पी येथील लिमाखोंगमध्ये तैनात होते. तर, पश्चिम इंफाळमधील तारुंग येथील रहिवासी होते. सीपॉय कोम सुट्टीवर आपल्या घरी आले होते. सकाळच्या सुमारास 10 अज्ञात शस्त्रधाऱ्यांनी सीपॉय कोम यांचे त्यांच्या घरुन अपहरण केले. या घटनेचा एकच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. तो म्हणजे त्यांचा 10 वर्षांचा मुलगा. मुलाने सांगितलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात लोक घरात घुसले तेव्हा घरात तो आपल्या वडिलांसोबत काम करत होते.  शस्त्रधारी लोकांनी सीपॉयच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्याला एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून निघून गेले. त्यानंतर  खुनींगथेक गावात जवानाचा मृतदेह आढळून आला होता. 

रविवारी सकाळपर्यंत जवानाचा शोध घेण्यात येत होता. त्यानंतर 9.30 वाजेच्या दरम्यान त्याचा मृतदेह खुनींगथेक गावात आढळून आला होता. त्याचे भावाच्या मदतीचे मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जवानाच्या डोक्यात गोळी घालण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. मृत जवानाच्या पश्चात्त त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. जवानाच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी भारतीय सैन्याच्या जवानाना पाठवण्यात आले आहे. मृत जवानाच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथील परिस्थिती बिघडली आहे. कुकी आणि मैतेई या दोन गटातील लोकांमध्ये सुरू असलेले हिंसा अद्याप सुरूच आहे. हिंसाचाराच्या घटना घडत असल्याने मणिपूर अशांत आहे. 3 मेपासून मणिपूरमध्ये हिंसा सुरू आहे. आत्तापर्यंत 175 लोकांचा मृत्यू झाला असून राज्यात 1108 लोक जखमी आहेत. तर , 32 अजूनही बेपत्ता आहेत. तर, 96 बेवारस मृतदेह शवगृहात ठेवण्यात आले आहेत.