Mankind Pharma files IPO papers with Sebi: आयपीओ मार्केटमध्ये लवकरच आणखी एका दिग्गज कंपनीचं नाव जोडलं जाणार आहे. मॅनकाइंड फार्मा आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी सेबीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) पेपर्सचा मसुदा दाखल केला आहे. मॅनकाइंड फार्मा ही कंपनी मॅनफोर्स कंडोम बनवते. या कंपनीचा आयपीओ सुमारे 5,500 कोटी रुपये असू शकतो अशी अपेक्षा आहे. जर कंपनी एवढ्या मोठ्या रकमेचा आयपीओ घेऊन येत असेल, तर तो कोणत्याही देशांतर्गत फार्मास्युटिकल कंपनीचा सर्वात मोठा आयपीओ असेल.
कंपनीबद्दल माहिती आहे का?
1991 मध्ये स्थापन झालेली, मॅनकाइंड फार्मा ही भारतातील आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी आहे. ब्रँडेड जेनेरिक औषधांव्यतिरिक्त, कंपनीच्या आघाडीच्या ब्रँडमध्ये प्रीगा-न्यूज प्रेग्नन्सी टेस्टिंग किट, मॅनफोर्स कंडोम, गॅस-ओ-फास्ट आयुर्वेदिक अँटासिड औषधांचा समावेश आहे. 31 मार्च 2022 पर्यंत, कंपनीकडे हिमाचल प्रदेश, सिक्कीम, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांसह संपूर्ण भारतात 23 उत्पादन सुविधा आहेत.
कंपनीचा नफा
मॅनकाइंड फार्माने 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात वार्षिक आधारावर 1,084.37 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. एका वर्षापूर्वी हा आकडा 958.23 कोटी रुपये होता. दुसरीकडे, आर्थिक वर्ष 21 मध्ये निव्वळ विक्री 13.16 टक्क्यांनी वाढून 5,529.60 कोटी रुपये झाली. कंपनीने कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, IIFL सिक्युरिटीज लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचा बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून समावेश केला आहे.