छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक

छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा चकमक

Updated: Nov 11, 2018, 01:31 PM IST
छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक  title=

नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलात पुन्हा एकदा चकमक झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानापूर्वी ही चकमक झाल्याने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या विजापूर जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

काही काळ चकमक झाल्यानंतर नक्षलवादी या ठिकाणाहून पसार झाले. त्यानंतर पोलीस दलाने केलेल्या शोध मोहिमेत एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. त्यासोबत एक बंदूक आणि काही साहित्यही मिळाले. नक्षलवाद्यांकडून गोम आणि गट्टाकल या कोयली बेडा भागात सहा आयईडी स्फोटके पेरण्यात आली होती. 

दुसरीकडे सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. बेदरे याठिकाणी सुरक्षा दलाचे जवान गस्तीवर असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला. त्यावेळी केलेल्या आयईडी हल्ल्यादरम्यान जवान जखमी झाला. महिंदर सिंग असे या जवानाचे नाव असून त्याला त्वरीत विमानाने रायपूर येथे हलविण्यात आले आहे असे नक्षलवाद विरोधी कारवाईचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदराज यांनी सांगितले. मात्र उपचारादरम्यान या जवानाचा मृत्यू झाला.

सध्या या भागात सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरु असल्याचेही ते म्हणाले. मतदान प्रक्रिया सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी सुरक्षा दलावर मोठा दबाव आहे. ही निवडणूक योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी सुरक्षा दलाला विशेष सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.