...या कारणामुळे मराठमोळ्या उद्योजकाला मिळाला UAE प्रतिष्ठित GOLDEN VISA

भारतामधील केंद्र सरकारशी संपर्क साधून त्यांनी पुणे-मुंबईतील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली.   

Updated: Jul 1, 2021, 12:35 PM IST
 ...या कारणामुळे मराठमोळ्या उद्योजकाला मिळाला UAE प्रतिष्ठित GOLDEN VISA title=

 मुंबई : लॉकडाऊनमध्ये आखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या पुण्या-मुंबईतील हजारो नागरिकांसाठी दुबईतील राहुल तुळपुळे हे युवा उद्योजक रियल हीरो ठरले आहेत. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीची दखल UAE प्रशासनाने घेतलीये. ज्याचं प्रतीक म्हणून त्यांना 10 वर्षांसाठी UAE चा प्रतिष्ठीत असा गोल्डन विझा देण्यात आलाये.

आखाती देशांमधील भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेत दक्षिण भारतातील नागरिक मोठ्या संख्येने परतले. मात्र, पुण्या-मुंबईतील 10 हजारांहून अधिक नागरिक तेथे अडकले होते. या नागरिकांची अडचण लक्षात आल्यानंतर त्यांच्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यास तुळपुळे यांनी अथक परिश्रम घेतले होते. 

दुबईत अडकलेल्या धनश्री पाटील यांनी त्यासंदर्भात सोशल मीडियावर केलेली पोस्ट तुळपुळे यांनी पाहिली. गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमच्या माध्यमातून तुळपुळे यांनी दुबईमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. तसेच भारतामधील केंद्र सरकारशी संपर्क साधून पुण्या-मुंबईतील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली. 

आखाती देशातून पुण्या-मुंबईत येणारे हे पहिलेवहिले खाजगी चार्टर्ड विमान ठरत आहे. नोकरी गेल्यामुळे किंवा व्यवसायात नुकसान झाल्यामुळे तिकिटाचे पैसेही भरू शकत नसलेल्यांना फोरमच्या वतीने आर्थिक मदत देण्यात तुळपुळे यांनीच पुढाकार घेतला. तसेच पुणे-मुंबईतील नागरिकांच्या भारतामध्ये आल्यानंतर विलगीकरणाची सर्व व्यवस्था नियमानुसार पूर्ण केली जाईल याची खातरजमाही तुळपुळे यांनी केली.