या मराठी माणसाने बनवलाय सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा

 एका मराठी माणसाने बनवला जगातील सर्वात उंच पुतळा

Updated: Nov 1, 2018, 07:56 PM IST
या मराठी माणसाने बनवलाय सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा title=

मुंबई : गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तटावर सरदार पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालं. पण महत्त्वाचं म्हणजे हा पुतळा एका मराठी माणसाने बनवला आहे. पद्मभूषण मूर्तिकार राम सुतार यांनी हा पुतळा डिझाईन केला आहे. त्यांच्या देखरेखेखालीच हा पुतळा चीनमध्ये बनवण्यात आला. आज लोकार्पण सोहळ्या दरम्यान ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करत राम सुतार यांना शुभेच्छा दिल्या होत्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी मूर्तिकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार मंगळवारी नोएडा येथून गुजरातला पोहोचले. ते देखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

राम सुतार यांच्याबाबत देखील तेथे माहिती दिली जाणार आहे. पुतळा कसा असावा याचं मॉडल आणि त्यांची निर्मिती याची संपूर्ण जबाबदारी राम सुतार यांच्यावर होती. खास गोष्ट म्हणजे हा पुतळा बनवण्यासाठी राम सुतार यांचं नाव एका अमेरिकेच्या इतिहासकाराने सुचवलं होतं.

राम सुतार यांचा मुलगा अनिल सुतार यांनी अहमदाबाद विमानतळावर बनवलेला सरदार पटेलांचा पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिला होता. तसाच पुतळा बनवण्याचा विचार यावेळी पंतप्रधान मोदींनी केला. या पुतळ्याच्या निर्मितीसाठी एक ट्रस्ट बनवण्यात आला. पुतळ्यासोबतच ऑडिटोरियम, फिरण्यासाठी जागा आणि अऩेक छोट्या- मोठ्या गोष्टींचा विचार येथे करण्यात आला. हा पुतळा बनवण्याचं काम अमेरिकेचे आर्किटेक्ट मायकल ग्रेव्स यांना देण्यात आलं.

सरदार पटेल यांचा हा पुतळा कसा असावा. वेशभूषा, चेहरा आणि इतर गोष्टी कशा असाव्या यासाठी अमेरिकेचे इतिहासकार आणि पेंसिलवेनिया यूनिवर्सिटीचे प्रोफेसर मायकल मायस्टर यांना ही जबाबदारी देण्यात आली. त्यांना भारतात विविध ठिकाणी फिरुन सरदार पटेल यांचे पुतळे पाहिले. मायस्टरने संपूर्ण भारतात फिरल्यानंतर अहमदाबाद एअरपोर्टवर असलेला पुतळा पाहिला. यानंतर हा पुतळा राम सुतार यांनी बनवल्याचं त्यांना कळालं आणि त्यांनी य़ासाठी त्यांचं नाव पुढे केलं.