मोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइड CCTV फुटेज समोर

Mathura Train Accident CCTV Footage:  कर्मचाऱ्याने आपली बॅग निष्काळजीपणे इंजिनच्या थ्रॉटलवर (एक विशेष उपकरण) ठेवली आणि नंतर आपल्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहण्यात व्यस्त झाला. पिशवीच्या दाबामुळे, थ्रोटल पुढे जाण्याच्या स्थितीत गेले, परिणामी EMU प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे सरकले.

Pravin Dabholkar | Updated: Sep 28, 2023, 03:13 PM IST
मोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइड CCTV फुटेज समोर title=

Mathura Train Accident CCTV Footage:  मथुरा येथे मंगळवारी झालेल्या रेल्वे अपघातानंतर देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर हा अपघात नेमका कसा झाला? यासाठी संयुक्त तपास करण्यात आला. या अहवालात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रेन ऑपरेशन दरम्यान, रेल्वे कर्मचारी त्याच्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहत होता आणि तो थोडासा स्तब्ध होता. त्याने मादक द्रव्याचे सेवनही केले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर ही घटना समोर आली होती. अहवालात रेल्वे अपघाताचे प्रथमदर्शनी कारण नमूद करण्यात आले. 'क्रू व्हॉईस अँड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टीम'नुसार ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर सचिन नावाचा रेल्वे कर्मचारी मोबाईलवर काहीतरी पाहत होता. मोबाईल फोन पाहतच त्याने डीटीसी कॅब(इंजिन) मध्ये प्रवेश केला, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

त्या कर्मचाऱ्याने आपली बॅग निष्काळजीपणे इंजिनच्या थ्रॉटलवर (एक विशेष उपकरण) ठेवली आणि नंतर आपल्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहण्यात व्यस्त झाला. पिशवीच्या दाबामुळे, थ्रोटल पुढे जाण्याच्या स्थितीत गेले, परिणामी EMU प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे सरकले, असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आलाय

अर्धा डबा फलाटाच्या वर चढला

ट्रेनने वेग पकडल्याने प्लॅटफॉर्मचा पुढचा भाग तुटला आणि रेल्वेचा अर्धा डबा प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या वरच्या भागावर गेला. परिणामी ओएचई (ओव्हरहेड वायर) वरही परिणाम झाला, असे अहवालात म्हटले आहे. 

घटनेनंतर सचिनची ब्रेथलायझर चाचणी करण्यात आली. यामध्ये तो सौम्य नशेच्या अवस्थेत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अल्कोहोलच्या सेवनाची नेमकी पातळी शोधण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले जातील, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

डीआरएमकडून पाच कर्मचारी निलंबित 

या घटनेप्रकरणी विभागीय रेल्वे व्यवस्थापक तेजप्रकाश अग्रवाल यांनी सचिनसह पाच जणांना निलंबित केले आहे. या चौघांमध्ये हरभजन सिंग, ब्रजेश कुमार आणि कुलजीत हे तांत्रिक कर्मचारी आहेत तर गोविंद हरी शर्मा हे लोको पायलट आहेत.आम्ही पाच जणांना निलंबित केले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे अग्रवाल म्हणाले.

सामान्यतः तंत्रज्ञ डीटीसी कॅबची (इंजिन) चावी घेतात पण या प्रकरणात तंत्रज्ञांनी सचिनला चावी घेण्यासाठी पाठवले होते, असे संयुक्त अहवालात असे म्हटले आहे. ट्रेन रात्री 10.49 वाजता मथुरा स्थानकावर पोहोचली. ड्युटी संपवून जेव्हा लोको पायलट कॅबमधून बाहेर आला तेव्हा सचिन चावी घेण्यासाठी कॅबमध्ये घुसला. तो कॅबमध्ये चढल्यानंतर एका मिनिटातच ती हलू लागली आणि अर्धी प्लॅटफॉर्मवर चढली, अशी माहिती देण्यात आली.