नवी दिल्ली : अलवरमध्ये गो-तस्करीच्या संशयावरून जमावाकडून झालेल्या माराहणीनंतर २८ वर्षीय रकबर खान याचा मृत्यू झाला. या भयानक घटनेनंतर 'मॉब लिंचिंग'वर संसदेपासून ते गल्लीबोळापर्यंत चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, 'शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी एक वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत आलेत. आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी, 'जर देशातील लोकांनी बीफ खाणं बंद केलं तर देशातील मॉब लिंचिंगच्या घटना थांबतील', असं म्हटलं होतं... 'शिया वक्फ बोर्डा'चे अध्यक्ष वसीम रिझवी यांनीही इंद्रेश कुमार यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलंय. इतकंच नाही तर, इस्लाममध्ये गायीचं मांस 'हराम' असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
मुस्लिमांनी बीफ खाणं बंद करायला हवं... गो-हत्या बंद व्हायला हवी... इस्लाममध्येही गायीचं मांस हराम आहे. तुम्ही मॉब लिंचिंग थांबवू शकत नाही कारण प्रत्येक छोट्य़ा छोट्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाऊ शकत नाही. त्यामुळे, गो-हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षेचं प्रावधान असणारा कायदा अस्तित्वात आणायला हवा, असं वसीम रिझवी यांनी म्हटलंय.
यासोबतच, इंद्रेश कुमार यांचं वक्तव्य महत्त्वाचं आहे. कुणाच्याही धार्मिक भावनांना दुखावलं जाऊ नये. जर गायीच्या हत्येसंबंधी कायदा अस्तित्वात आला तर मॉब लिंचिंग रोखली जाऊ शकेल. जर एखाद्या समुदायानं गायीला 'आई'चा दर्जा दिला असेल तर तुम्ही तिची हत्या करू शकत नाही, असंही रिझवी यांनी म्हटलंय.