कारगिलमध्ये इंटरनेट सुरू, जम्म-काश्मीरचं काय?

५ ऑगस्ट  २०१९ रोजी अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख भागात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती

Updated: Dec 28, 2019, 05:45 PM IST
कारगिलमध्ये इंटरनेट सुरू, जम्म-काश्मीरचं काय?

लडाख : एकीकडे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनामुळे देशातील काही भागांत इंटरनेट अजूनही बंद आहे. अशा स्थितीत दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधून विलग होऊन केंद्र शासित करण्यात आलेल्या लडाख भागातील कारगिल आणि द्रास भागात इंटरनेट सेवा सुरू करण्यात आलीय. ५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख भागात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती. जवळपास १४५ दिवस लडाख भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.   

लडाख भागात मोबाईल आणि ब्रॉडबँड सेवा अगोदरपासून सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु, इंटरनेट मात्र अद्याप बंद होतं. 

जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट बंद असलं तरी इथं तैनात असलेल्या केंद्रीय दलाला माघारी बोलावण्यात आलंय. यामुळे, जवळपास ७००० अर्धसैनिक दलाचे जवान टप्प्याटप्प्यानं जम्मू-काश्मीरमधून निघून आपापल्या ठिकाणी (जम्मू-काश्मीरमध्ये येण्यापूर्वीचं तैनातीचं ठिकाण) परत जाणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमधून २० कंपन्यांना परत बोलावण्यात आलं. प्रत्येक कंपनीत जवळपास १०० जवान तैनात असतात.