मोदींना उद्या पंतप्रधानपदाची शपथ; मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?

पहिल्या टप्प्यात किती मंत्र्यांची वर्णी लागते याकडे साऱ्यांचा नजरा लागून आहेत

Updated: May 29, 2019, 02:06 PM IST
मोदींना उद्या पंतप्रधानपदाची शपथ; मंत्रिमंडळात कुणाची वर्णी? title=

नवी दिल्ली : लोकसभेत भाजपा आणि घटक पक्षांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता साऱ्यांच्या नजरा मंत्रिमंडळाकडे लागल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यात मंगळवारी चार तास नव्या मंत्रिमंडळाबाबत खलबतं झाली. या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली. जवळपास ६५ ते ७० खासदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आधीच्या सरकारमधील अनुभवी व ज्येष्ठ मंत्र्यांची नव्या मंत्रिमंडळातही वर्णी लागणार हे निश्चित असले तरी त्यांची खाती मात्र बदलली जाणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेषत: गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र या प्रमुख खात्यांना नवे मंत्री मिळणार आहेत. दरम्यान, ३० मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी पहिल्या टप्प्यात किती मंत्र्यांची वर्णी लागते याकडे साऱ्यांचा नजरा लागून आहेत.

कशी असेल पंतप्रधान मोदींची नवी टीम?

पंतप्रधाम मोदींची नवी टीम कशी असेल याची उत्सुकता आता लागली आहे. मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल. कॅबिनेटमध्ये वर्णी लागताना काय निकष असतील? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या संघाला २०२४ चं लक्ष्य डोळ्यांसमोर ठेऊन काम करावं लागणार आहे. त्यामुळे मोदींची नवी टीम कशी असेल? त्यात कोण कोण सहभागी असतील? याची उत्सुकता लागली आहे. भारताला विश्वगुरू बनवणारी टीम कशी असेल? त्याचा अजेंडा काय असेल? 

लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश पाहता नव्या टीमला ४ भागांत वाटलं जाऊ शकतं. अनुभव, वैशिष्ट्य, युवा, प्रादेशिक संतुलन, महिला प्रतिनिधीत्व हे निकष प्रामख्याने असतील. मोदींच्या मंत्रिमंडळात अनुभवाला सर्वाधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. २०१४ ला मोदींच्या कोअर टीममध्ये ४ सर्वाधिक अनुभवी चेहरे होते. धोरण निश्चितीसाठी अनुभव सर्वात महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे मोदींच्या यावेळच्या मंत्रिमंडळात विविध क्षेत्रातले तज्ज्ञ असण्याची शक्यता अधिक आहे. 

संपूर्ण प्रचारात मोदींनी तरूण वर्गाला विशेष स्थान दिलं. २०१९ मध्ये २५ ते ४० या वयोगटातले १२ टक्के उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे मंत्रिमंडळात युवा वर्गाला स्थान मिळेल अशी दाट शक्यता आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीयत्व आणि प्रादेशिक एकता यांचा नारा दिलाय. त्यामुळे प्रादेशिक संतुलन मंत्रिमंडळातही दिसेल. २०१९ लोकसभा निवडणुकीत लोकसभेत ७६ महिला खासदार निवडून आल्या आहेत. गेल्या वेळी संरक्षण विषयक कॅबिनेट समितीत दोन महिला मंत्री होत्या. त्यामुळे यावेळीही महिलांना विशेष संधी मिळेल अशी शक्यता आहे. 

जनतेच्या आकांक्षा पूर्ण करतील अशाच लोकांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. कोणाची वर्णी लागेल हे थोड्याच कालावधीत कळेल.