मुंबई : कोरोनाबाधित रूग्णांच्या चाचणीचे नमुने घेऊन एका प्रयोगशाळा तंत्रज्ञावर माकडांनी हल्ला केल्याची अजब घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे माकडांनी यावेळी त्या तंत्रज्ञाच्या हातातून संशयित कोरोना रूग्णांचे नमुने खेचून पळ काढल्याची घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मेडिकल कॉलेजच्या आवारात हा प्रकार घडला आहे.
मेरठमधील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाची लागण झाल्याचा संशय असणाऱ्या तिघांचे नमुने घेण्यात आले होते. पण नमुन्यांची चाचणी होण्याआधीच माकडांनी हे नमुने पळवले आहेत. डॉक्टरांनी आता नव्याने रूग्णांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत.
डॉक्टरांना आता या गोष्टीची भीती आहे की, माकडांनी जर चाचणीचे नमुने इथे-तिथे फेकले तर कोरोनाचा संक्रमण वाढण्याचा धोका सर्वाधिक आहे. जर माकडांकडून हे नमुने मानवी वस्तीमध्ये फेकले गेले तर धोका जास्त प्रमाणात आहे. तसेच अद्याप माकडांना कोरोनाची लागण होऊ शकते का? याबाबत कोणतीच पुरेशी माहिती उपलब्ध नाही.
अनेक शहरांमध्ये माकडांची समस्या सर्वाधिक आहे. लॉकडाऊनमुळे सध्या माकडांच्या खाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. माकडांना सहजपणे मानवी वस्तीत खायला मिळत असे. पण सध्या याचा अभाव आहे. यामुळे माकड आक्रमक झाले आहेत. अन्नासाठी आता माकड मानवावर हल्ला करत असल्याची घटना समोर आली आहे.