MP Jilha Court Decesion: घडलेल्या गुन्ह्याप्रमाणे न्यायालय संबंधित दोषीला शिक्षा सुनावत असते. अगदी तुरुंगवास ते फाशी, जन्मठेपेपर्यंतच्या सुनावल्या शिक्षा आपण ऐकल्या आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकारात दोषी आढळलेल्या व्यक्तीस तब्बल 170 वर्षांची शिक्षा सुनावल्याचे समोर आले आहे. या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
यूएस-युरोपियन न्यायालयांनी गुन्हेगारांना 100-200 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आपण बातम्यांमध्ये वाचलेल्या असतात. पण भारतातील न्यायालयाने असा निर्णय दिल्याची घटना आपण कदाचित ऐकली नसेल. आपल्या येथे जन्मठेप मोठी शिक्षा मानली जाते. जी 14 वर्षांपासून आजन्म असू शकते.
आता भारतातील एका जिल्हा न्यायालयाने एका आरोपीला 170 वर्षे तुरुंगात राहण्याची शिक्षा दिली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय आरोपीला ही शिक्षा देण्यात आली आहे. संबंधित आरोपीवर फसवणुकीचे ३४ गुन्हे दाखल आहेत. आरोपीला शिक्षा सुनावण्यासोबतच न्यायालयाने 3 लाख 40 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
पोलिसांनी आरोपी नासीर मोहम्मद उर्फ नासीर राजपूत याला सागर जिल्हा न्यायालयात हजर केले होते. मुळच्या गुजरातमधील तापी जिल्ह्यातील नसीर याने सागर जिल्ह्यातील भैंसा गावातील लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी नसीरवर ३४ गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणात न्यायालयाने त्याला आयपीसी कलम 420 अंतर्गत दोषी घोषित केले. यासोबतच प्रत्येक प्रकरणासाठी ५-५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
यासोबतच प्रत्येक प्रकरणात 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नासीरची एक शिक्षा भोगून झाल्यावर दुसऱ्या खटल्यातील शिक्षा सुरु होणार आहे. यामुळे प्रत्येक गुन्हात 5 वर्षे याप्रमाणे नासिरला 34 प्रकरणांमध्ये एकूण 170 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. न्यायालय एवढ्यावरच थांबले नसून त्याला 3 लाख 40 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. इतक्या वर्षांची शिक्षा आणि दंड सुनावल्याने हा निर्णय चर्चेचा विषय बनला आहे.
नासीरविरोधात 34 लोकांची फसवणूकीची तक्रार केली होती. कापड कारखाना सुरू करण्याच्या नावाखाली नसीरने या लोकांकडून एकूण 72 लाख रुपये उकळले. यानंतर तो कुटुंबासह फरार झाला होता. त्याच्याविरुद्ध २०१९ मध्ये पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. दरम्यान तो कर्नाटकात पळून गेल्याचे निष्पन्न झाल्याचे तपासात समोर आले.
यानंतर सागर जिल्हा पोलिसांनी त्याला कर्नाटकातील कलबुर्गी परिसरातून अटक केली. 19 डिसेंबर 2023 रोजी त्याला सागर येथे आणले. तेव्हापासून त्याच्यावर खटला सुरू होता.