हुंड्यात आवडती बाईक मिळाली नाही म्हणून रुसला नवरदेव... भावाला चोपलं आणि काढला पळ

Crime News : मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपींविरुद्ध पोलिसांनी हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे

Updated: Feb 11, 2023, 05:06 PM IST
हुंड्यात आवडती बाईक मिळाली नाही म्हणून रुसला नवरदेव... भावाला चोपलं आणि काढला पळ title=

Crime News : हुंडा (dowry) प्रथेविरूद्ध कठोर कायदे करुन आणि जागरूकता मोहीमा राबवूनही, ही परंपरा आजही अनेक ठिकाणी सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. सासरच्यांकडून अनेकदा हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची अनेक प्रकरणी समोर आले आहेत. अनेकदा काहींना आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललं आहे. तर काही ठिकाणी हुंड्यामुळे हत्या झाल्याचेही समोर आले आहे. मात्र अद्यापही अशी प्रकरणे सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) घडलाय.

मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये एका लग्नात हुंड्यात बाईक देण्यावरून बराच गोंधळ झाला. नवरदेवाला हुंड्यात मनासारखी बाईक न मिळाल्याने त्याने लग्नास नकार दिला. वराला अपाची बाईक हवी होती मात्र मुलीकडच्यांनी त्याला दुसरी बाईक दिली. यामुळे नवरदेवाला राग आला आणि तो थेट लग्न मंडपातून उठून निघून गेला. नवरदेवाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वधूच्या भावालाही त्याने मारहाण केली. यानंतर मुलीच्या बाजूचे लोक पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आणि तक्रार नोंदवली.

8 फेब्रुवारी रोजी ग्वाल्हेरच्या आराधना गार्डनमध्ये मोनू कुशवाहा याचे लग्न होणार होते. नवरदेवाला ओवाळून लग्न मंडपात आणण्यात आले. मात्र मंडपात पोहोचल्यावर सगळ्यात आधी त्याने मला अपाचे बाईक हवी असल्याचे सांगितले. त्यानंतर वधू-वरांनी एकमेकांना हार घालण्याचा विधीही पूर्ण झाला होता. यानंतर दोघे मंडपात सप्तपदी घेण्यासाठी उभे राहिले. तेवढ्यात नवरदेवाची नजर शाईन बाईकवर पडली. आपल्याला अपाचे बाईक मिळणार नसल्याचे समजताच नवरदेवाने सप्तपदी घेण्यास नकार दिला.

दरम्यान, मुलीचे वडील आणि भावाने नवरदेवाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण नवरदेव आपल्या हट्टाला पेटून उठला होता. त्याने लग्न मोडण्याची धमकी दिली असता मुलीच्या भावाने त्याला विरोध केला. यानंतर नवरदेवातने वधूच्या भावासह इतर लोकांना मारहाण केली आणि भावासोबत पळ काढला. यानंतर नववधू आणि तिच्या भावाने जनकगंज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. वधूच्या भावाच्या तक्रारीवरून वर मोनू कुशवाह, त्याचे वडील गुड्डू, भाऊ गोपी आणि गुलशन यांच्या विरोधात हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.