30 Year Old Doctor Dies Due To Heart Attack In His Own Wedding: उत्तराखंडमधील अलमोडा जिल्ह्यातील रानीखेतमध्ये एका डॉक्टरच्या मृत्यूचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नमंडपामध्ये सप्तपदी घेतानाच डॉक्टर तरुणाचा मृत्यू (Doctor Dies Due To Heart Attack) झाला आहे. सप्तपदी घेत असतानाच या तरुणाच्या छातीत दुखू लागलं (Heart Attack) आणि तो चक्कर येऊन पडला. नवरा मुलगा लग्नमंडपामध्ये चक्कर येऊन पडल्याने एकच गोंधळ उडाला. आधी चेहऱ्यावर पाणी मारुन त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यात फारसं यश आलं नाही. म्हणून नातेवाईकांनी त्याला तातडीने रानीखेतमधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
समीर उपाध्याय असं या मृत्यू झालेल्या तरुण डॉक्टरचं नाव आहे. हल्द्वानी येथील मॅट्रिक्स हॉस्पिटलमध्ये समीर डेंटिस्ट होता. शुक्रवारी तो आपली वरात घेऊन हल्द्वानीहून रानीखेतला पोहचला. लग्नाआधी समीरची प्रकृती अगदी ठणठणीत होती. मात्र अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं आणि हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला. नवऱ्या मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. समीर केवळ 30 वर्षांचा होता. समीरच्या मृत्यूमुळे त्याच्या घरच्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी हल्द्वानी येथील समीरच्या घरी संगीत आणि पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र नवऱ्या मुलाचाच मृत्यू झाल्याने उपाध्याय कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला. डॉक्टर समीरला दोन बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे तर छोटी बहिणीही डॉक्टर आहे. काही काळापूर्वीच समीरचे वडील ओमानवरुन परतले होते. मात्र त्यांनाही प्रकृतीसंदर्भातील तक्रारी होत्या. आपल्या आई वडिलांचा समीर हा एकमेव आधार होता.
शनिवारी सकाळी समीर रानीखेतवरुन नव्या नवरीसहीत घरी परतणार होता. मात्र त्याच घरी त्याचं पार्थिव आणण्याची वेळ उपाध्याय कुटुंबावर आली. समीरचा मृत्यू झाला आहे यावर त्याच्या घरच्यांचा विश्वासच बसत नाही. मॅट्रिक्स हॉस्पीटलचे डायरेक्टर आणि हल्द्वानी शहरातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर प्रदी पांडेंनी, समीरला प्रकृतीसंदर्भात कोणतीही अडचण नव्हती. या वयामध्ये हार्टअटॅकने मृत्यू होणं हे आश्चर्यचकित करणारं असून यावर संशोधन आवश्यक असल्याचं डॉ. पांडे म्हणाले.