खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात, पाहा खासदार-आमदारांना पगार किती?

खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

Updated: Apr 6, 2020, 05:41 PM IST
 खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात, पाहा खासदार-आमदारांना पगार किती? title=

मुंबई : खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एक वर्षासाठी ही कपात असणार आहे. एवढंच नाही तर खासदार विकास निधी देखील आरोग्य मंत्रालयाकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.

एकीकडे आमदार खासदारांचे पगार वाढवण्यावर सर्वसामान्यांकडून नेहमीच टीका होत आहे. तर कोरोना व्हायरसचं उच्चाटन करण्यासाठी आर्थिक हातभार म्हणून  केंद्र सरकारने खासदारांच्या पगारात देखील ३० टक्के कपात केली आहे.

खासदारांनाही जवळपास २ लाखांपर्यंत पगार आहे.  यात १ लाख मूळ पगाराचा समावेश आहे, यात आता ३० टक्के कपात होणार आहे.

तर दुसरीकडे खासदारांच्या पगाराला कात्री लागल्याने,  देशातील सर्व आमदारांच्या पगाराची कपात करण्यावर जोर वाढणार आहे.

आपल्या राज्यातील आमदारांनाही १ लाख ८६ हजार १२० रूपये महिन्याला पगार असतो. त्यात मूळ वेतन ६७ हजार रूपयांचा समावेश आहे. तसेच काही रेल्वे आणि विमान प्रवास फ्री तसेच इतर भत्ते देखील मिळतात.

देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस बाधितांची संख्या वाढत चालली आहे. देशात २४ तासात ३२ कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पण तरीही देशात हा कम्युनिटी संसर्ग नसल्याचं
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.