मुंबई : जगात कोरोनाचे संकट आहे. आर्थिक घडी कोलमडत असताना एक चांगली बातमी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत ठरले आहेत. (Mukesh Ambani Asia's richest man ) त्यांनी जॅक मा (Jack Ma) यांना मागे टाकले आहे. बुधवारी रिलायन्स जिओ-फेसबुक डील (Reliance Jio-Facebook deal )जाहीर झाल्यानंतर मुकेश अंबानीच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
याआधी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अलिबाबाचे संस्थापक जॅक मा होते. गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संपत्तीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिलायन्स जिओ-फेसबुकबरोबर झालेल्या व्यवहारामुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती ४ अब्ज डॉलरने वाढून ४९ अब्ज डॉलवर पोहोचली आहे.
दरम्यान, करारापूर्वी २०२० मध्ये अंबानी यांच्या संपत्ती घसरण झाली होती. मार्चच्या सुरुवातीला जॅक मा यांच्याही संपत्तीत घसरण झाली होती. तरीही ते श्रीमंत यादीत अव्वल होते. त्याआधी अंबानी यांनी जॅक मा यांनी मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला होता. जॅक मा यांच्या तुलनेत अंबानी यांची संपत्ती ३ अब्ज डॉलरनी वाढली आहे. ब्ल्यूमबर्गच्या आकडेवारीनुसार (२१ एप्रिलपर्यंत) अंबांनी यांची संपत्ती १४ अब्ज डॉलरपर्यंत घसरली होती. तर, जॅक मा यांच्या एकूण संपत्तीत १ अब्ज डॉलरची घट नोंदवण्यात आली होती.
नव्या करारानुसार जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड या कंपनीमध्ये फेसबुक ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीनंतर जिओमध्ये फेसबुकची हिस्सेदारी ९.९९ टक्क्यांवर पोहोचली आहे. भारतातील कोणत्याही कंपनीमधील अल्प भागीदारीसाठी करण्यात आलेली ही आजवरची सर्वांत मोठी विदेशी गुंतवणूक ठरली आहे. जिओ प्लॅटफॉर्मसाठी प्री मनी एंटरप्राइज व्हॅल्यू आता जवळपास ६६ अब्ज डॉलर असेल. या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मचे एकूण बाजारमूल्य ४.६२ लाख कोटी रुपयांवर जाणार आहे.