चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या आजारामुळे रुग्णालयाच्या बाहेर रांगा; भारतात अलर्ट

Mysterious Virus Infection in China : सध्या चीनला एका रहस्यमयी श्वसनाच्या आजाराने ग्रासलं आहे. चीनमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात न्यूमोनियाचा त्रास दिसून येत आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

आकाश नेटके | Updated: Nov 24, 2023, 04:25 PM IST
चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या आजारामुळे रुग्णालयाच्या बाहेर रांगा; भारतात अलर्ट title=
(फोटो - Reuters)

Mysterious Virus Infection in China : कोरोनानंतर (Corona) संपूर्ण जगाचे डोळे आता चीनमध्ये उद्भवलेल्या नव्या आजाराकडे लागले आहेत. चीनमध्ये सुरु झालेल्या नव्या साथीने (Virus Infection) जगाचं टेंशन वाढलं आहे. कोरोनाप्रमाणेच या नव्या आजाराचा फैलाव चीनमधून सुरु झाला आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशातच भारत सरकारनेही या आजाराचा धोका बघून कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या चीनमध्ये एका गूढ आजाराने सर्वांनाच अडचणीत आणले आहे. या श्वसनाच्या आजाराने मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलांना ग्रासलं आहे. भारत सरकारही या गूढ आजारावर बारीक लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की भारत चीनमधील मुलांमध्ये निमोनियाच्या नोंदलेल्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. मात्र आतापर्यंतच्या मूल्यांकनानुसार भारताला या आजाराचा धोका कमी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की ते उत्तर चीनमधील मुलांमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरसची प्रकरणे आणि श्वसन आजाराच्या नोंदवलेल्या उद्रेकावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. चीनमधून नोंदवलेली एव्हीयन इन्फ्लूएन्झा प्रकरणे आणि श्वसनाच्या आजार या दोन्हींपासून भारताला कमी धोका आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सध्याच्या परिस्थितीतून उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी देश तयार आहे.

आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. "सध्याच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय चीनमधील मुलांमधील H9N2 उद्रेक आणि श्वसन आजारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरण तसेच चीनमधून नोंदवलेल्या श्वसन रोगांचा भारताला कमी धोका आहे. सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे, चीनमध्ये श्वसन रोगाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही. गेल्या काही आठवड्यात घटनांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. मुलांमध्ये श्वसन रोगाची सामान्य कारणे ओळखली गेली आहेत," असे आरोग्यमंत्रालयाने म्हटलं आहे.

देशातील एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरणांविरूद्धच्या तयारीच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या तांत्रिक शाखा, आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. ऑक्टोबर 2023 मध्ये, चीनमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरसचे एक प्रकरण नोंदवले गेले होते, ज्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला होता. आरोग्य मंत्रालयाने उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसन रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या मीडिया अहवालांचीही नोंद घेतली. 

लक्षणं कोणती?

चीनमध्ये वेगाने पसरत असलेला हा संसर्ग निमोनियासारखा आहे. मात्र या आजाराची लक्षणं निमोनियासारखी नाहीत. या विषाणूचा संसर्ग झालेल्या मुलांच्या फुफ्फुसांना सूज येते. संसर्ग झाल्यानंतर मुलांना मोठ्या प्रमाणात ताप येतो. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.