कोण होणार भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'?

पंतप्रधान यांच्यात सुसूत्रता आणि समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' यांच्यावर असेल

Updated: Dec 24, 2019, 04:55 PM IST
कोण होणार भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'?  title=

नवी दिल्ली : भारताच्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (Chief of Defence Staff) पदासाठी नावाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. भारतातल्या तिनही सैन्य दलांपैकी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याची या महत्त्वपूर्ण पदावर वर्णी लागणार? याबाबत उत्सुकता आहे. या महिन्याच्या अखेरीला निवृत्त होत असलेले जनरल बिपीन रावत यांची या पदावर नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पद निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना केली होती. तिन्ही सैन्यदल आणि संरक्षण मंत्रालय, तसंच पंतप्रधान यांच्यात सुसूत्रता आणि समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' यांच्यावर असणार आहे. 

गृह मंत्रालयाची आज या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. एनएसए अजित डोभाल यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या काय काय जबाबदाऱ्या असतील यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाच्या कॅबिनेट कमिटीला (CCD) एक अहवाल सादर केलाय. कॅबिनेटनं या रिपोर्टला मंजुरी दिलीय. 

Chief of Defence Staff अर्थात सीडीएस सरकारसाठी सैन्य सल्लागार म्हणून काम पाहतील. पंतप्रधान आणि सुरक्षा मंत्र्यांना रणनीती ठरवून देण्याचं काम सीडीएसकडे असेल. देशात पहिल्यांदाच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची नियुक्ती होणार आहे. 

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत यांचं नाव सीडीएससाठी आघाडीवर आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, हे पद 'फोर स्टार' असेल आणि सीडीएस सैन्य प्रकरणातील विभागांचे प्रमुख असतील. 

आता, तीनही लष्कर, नौसेना, वायुसेना यांचा संयुक्त अध्यक्ष असेल. अशा पद्धतीचं एक पद असावं अशी शिफारस कारगिल युद्धानंतर नियुक्त करण्यात आलेल्या सुब्रमण्यम कमिटीनं आपल्या अहवालात केली होती.