हैदराबाद: तेलगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अभिनेते नंदमुरी हरिकृष्ण यांचे निधन झाले आहे. एका चाहत्याच्या विवाहसोहळ्याला जाताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. नालगोंडा जिल्ह्यातील नारकेटपल्ली- अड्डकनी महामार्गावर हा अपघात बुधवारी घडला होता. तेव्हापासून त्यांची त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्राप्त माहितीनुसार अपघात घडला त्यावेळी ते स्वत:च वाहन हाकत होते.
दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून नंदमुरी हरिकृष्ण यांच्या अपघाती वाहनाची छायाचित्रे शेअर केली आहेत. ही छायाचित्रे पाहता या अपघाताची भीषणता स्पष्ट होते. अपघात घडल्यानंतर अल्पावधीतच त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे रूग्णालयात सांगितले. अभिनेते नंदमुरी यांचे दाक्षिणात्या कलाविश्व आणि चित्रपसृष्टीत भरीव योगदान होते. त्यांचा कलाविश्वातील स्वत:चा खास असा चाहता वर्ग आहेच. पण, राजकारणातही त्यांनी आपले असंख्य कार्यकर्ते निर्माण केले. या सर्वांनाच त्यांच्या अचानक जाण्याने धक्का बसला आहे.
#SpotVisuals: Actor and TDP leader Nandamuri Harikrishna dies in a car accident in Telangana's Nalgonda district. pic.twitter.com/4EusxbqXmw
— ANI (@ANI) August 29, 2018
सांगितले जात आहे की, अपघात घडला तेव्हा नंदमुरी हे चालकाच्या जागेवरून वाहनाबाहेर फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटना घडल्यानंतर अल्पावधीच (सकाळी साडेसातच्या सुमारास) त्यांना कामिनेनी रुग्णालयात नेण्यात आलं. पण, तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी सुहासिनी आणि मुलं कल्याण राम आणि नंदमुरी तारका राम राव असा परिवार आहे. नंदमुरी यांची दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.