मोदीजी, तुम्ही गांजा ओढून बोलता का?; आपच्या नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य

यावेळी मोदींपासून सावध राहा.

Updated: Mar 29, 2019, 08:36 AM IST
मोदीजी, तुम्ही गांजा ओढून बोलता का?; आपच्या नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना 'सराब' संबोधून केलेल्या टीकेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादात आता आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांनी उडी घेतली आहे. संजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोदीजी गांजा ओढून बोलतात का, याची तपासणी केली पाहिजे. एखादी सडकछाप व्यक्तीच राजकीय पक्षांसाठी शराब, हेरोईन आणि कोकेन असे शब्द वापरू शकते, असे संजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि आपमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. 

याशिवाय, संजय सिंह यांनी एका जाहीर सभेतही मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदींनी तुम्हाला फसवले. ते इतके खोटं बोलले की तुम्ही त्यांच्या जाळ्यात सापडलात. या सगळ्यानंतरही मोदी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करतात. हे पाहून मला 'शोले' हा हिंदी चित्रपट आठवतो. यामध्ये अमिताभ बच्चन धर्मेंद्र यांच्यासाठी बसंतीला मागणी घालायला तिच्या मावशीकडे जातात. त्यावेळी अमिताभ बच्चन म्हणतात की, धर्मेंद्र व्यसनी आणि जुगारी आहे, पण तुम्ही हे लग्न पक्के करा. मोदीजी हेदेखील धर्मेंद्र आहेत. देशात महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत, सुरक्षाव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मात्र, या सगळ्यानंतरही मोदी भाजपला मतदान करा, असे आवाहन करतायत. त्यामुळे यावेळी त्यांच्यापासून सावध राहा, असेही संजय सिंह यांनी म्हटले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मेरठ येथे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी मोदींनी विरोधकांचा समाचार घेताना मोदींनी समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल आणि बहुजन समाज पक्ष यांच्या आद्याक्षरांचा वापर करत हे पक्ष उत्तर प्रदेशसाठी ‘सराब’ असल्याचे म्हटले. ही सराब उत्तर प्रदेशसाठीच नव्हे, तर देशासाठीही घातकच असल्याचेही त्यांनी सांगितले.