पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानी दहशतवादाचा मुद्दा मांडला चीनसमोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली.

Updated: Jun 13, 2019, 08:21 PM IST
पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानी दहशतवादाचा मुद्दा मांडला चीनसमोर  title=

बिश्केक : बिश्केक येथील एससीओ शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानावर निशाणा साधला. दहशतवादा संदर्भात पाकिस्ताननी दिलेली वचने पाळली नसल्याचे पंतप्रधनान मोदींनी म्हटले. यावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानला वातावरण तयार करावे लागेल. भारत आणि पाकिस्तानातील नाते द्विपक्षीय झाल्याचेही ते म्हणाले.

गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. यानंतर जिनपिंग यांच्यासोबतची ही पहिलीच भेट होती. जिनपिंग यांच्याशी प्रतिनिधिमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. आम्ही परस्परांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध सुधारण्यावर मिळून काम करत राहू असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले. 

बैठकीच्या सुरुवातीसच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींचे विजयाबद्दल अभिनंदन केले. भारतातील निवडणुकांच्या निकालानंतर आपला संदेश मिळाला आणि आज पुन्हा एकदा तुम्ही मला शुभेच्छा दिला. मी यासाठी आपला खूप आभारी आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. जिनपिंग हे 15 जूनला 66 वर्षांचे होणार आहेत. यानिमित्ताने सर्व भारतीयांतर्फे पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या दिवसांत आपण दोघेही अनेक विषय पुढे नेऊ शकतो. आपल्या दोघांनाही हे करण्यासाठी अधिक वेळ आणि कार्यकाळ मिळाल्याचेही ते म्हणाले. वुहान येथील आपल्या भेटीनंतर आपल्या संबंधांमध्ये वेग आणि स्थिरता दिसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन्ही पक्षांच्या रणनितिक संबंधांमध्ये प्रगती झाली आहे. यामुळे दोघेही एकमेकांचे हित आणि समस्यांसदर्भात अधिक संवेदनशील आहोत. आणि यानंतर सहयोग वाढवण्याचे नवे क्षेत्र बनल्याचेही ते म्हणाले.