काँग्रेस-राष्ट्रवादी समोर आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा पेच

लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरत असलेले विरोधी पक्ष आता आपसातील जागा वाटप आणि आघाडीच्या पेचात अडकले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये अशी भूमिका काँग्रेसचे पदाधिकारी घेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने विधानसभेच्या पन्नास टक्के जागांची मागणी सुरू केली आहे. 

Updated: Jun 13, 2019, 06:22 PM IST
काँग्रेस-राष्ट्रवादी समोर आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा पेच title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरत असलेले विरोधी पक्ष आता आपसातील जागा वाटप आणि आघाडीच्या पेचात अडकले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये अशी भूमिका काँग्रेसचे पदाधिकारी घेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने विधानसभेच्या पन्नास टक्के जागांची मागणी सुरू केली आहे. 
 
लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर जागा वाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मांडत असताना काँग्रेसच्या काही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये अशी भूमिका मांडली आहे. पदाधिकाऱ्यांचा विरोध असला तरी काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू अशी भूमिका घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला खिंडीत पकडण्याची राष्ट्रवादीची रणनिती दिसते आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी 50-50 टक्के जागावाटप असावे अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नव्हती. 

त्यापूर्वी 2009 ची विधानसभा निवडणूक आघाडीत लढताना काँग्रेसने 169 तर राष्ट्रवादीने 119 जागा लढवल्या होत्या. मात्र आता 144-144 असे पन्नास टक्के जागा राष्ट्रवादीला हवे आहे. ताकद नसतानाही मुंबईतही 36 पैकी निम्म्या जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत. 

मागील विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळी लढली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसने 42 जागा जिंकल्या होत्या, तर 71 मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या होत्या आणि 56 मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळेच समसमान जागा वाटपाच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे आघाडीत जागा वाटपावरून मतभेद होण्याची चिन्हं आहेत.