नवी दिल्ली - ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून आता सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काही सेलिब्रिटी देशात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना लवकरच योग्य धडा शिकवला जाईल, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये ३ डिसेंबरला जमावाने पोलिस अधिकाऱ्याची हत्या केल्यानंतर अनेकांनी यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. नसीरुद्दीन शहा यांनीही याविषयावरून नाराजी व्यक्त केली. एका पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येपेक्षा गायींच्या हत्येला जास्त महत्त्व दिले जाऊ लागले आहे. विखारी विचारांचा फैलाव झाला असून, त्याला नियंत्रित करणे आता अवघड झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर उमा भारती म्हणाल्या की, देशात सध्या कटकारस्थान रचले जात आहे. नसीरुद्दीन शहा यांचे वक्तव्य याच कटाचा एक भाग आहे. काही लोकांना समाजात दुफळी माजवायची आहे. पण आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देऊ.
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही शहा यांच्या वक्तव्यावर टीका केली. जर तुम्हाला देशात असुरक्षित वाटत असेल, तर जिथे सुरक्षित वाटेल तिथे जाऊन राहा. याच देशात राहुन इथे असुरक्षित वाटत असल्याचे म्हणणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
रविवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही नसीरुद्दीन शहा यांच्यावर टीका केली होती. जर सर्वात सुरक्षित देशात कोणाला असुरक्षित वाटत असेल, तर यातून त्यांची असुरक्षित मानसिकताच दिसते. जाती-धर्मापलीकडे जाऊन देशातील प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे असुरक्षित वाटत असल्याचे म्हणणे मला पटत नाही.