National Women's Day : बिग बी अमिताभ बच्चन (Amitach Bachchan) यांच्या जीवनात घडलेले कैक किस्से त्यांनी अनेकदा विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं सर्वांसमोर आणले आहेत. अशा या अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहताना अनेकांनाच त्यांचा हेवा वाटतो. पण, प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबाला, आई- वडिलांनाही अडीअडचणींचा सामना करावा लागला होता हे वास्त तुम्हाला माहितीये का?
आजच्या काळात जिथं आंतरजातीय विवाहासंबंधी समाजात न्यूनगंड कायम आहे तिथंच गतकाळात बिग बींच्या कुटुंबातही आंजरजातीय विवाह आणि त्यानंतरचा विरोध अशीही परिस्थिती उदभवली होती. 1941 मध्ये बिग बींच्या वडिलांनी म्हणजे हरिवंशराय बच्चन यांनी तेजी यांच्याशी लग्न करत समाजाचं वैर पत्करलं होतं. या साऱ्याशी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक मोठं नाव असणाऱ्या कवयित्री सरोजिनी नायडू यांचाही बिग बींनी उल्लेख केला होता.
सरोजिनी नायडू या हरिवंशराय बच्चन यांच्या शब्दांच्या चाहत्या होत्या. त्या काळात हरिवंशराय यांनी शीख कुटुंबातील तेजी यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. बिग बी यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या वडिलांचं लग्न झालं तेव्हा ते अलाहबाद येथे राहत होते. तो काळ असा होता की परजातीतील मुलीशी लग्न करणं म्हणजे जणू शाप. हरिवंशराय बच्चन हे उत्तर प्रदेशातील कायस्थ कुटुंबातील होते, तर त्यांची आई एका शीख कुटुंबातील मुलगी होती.
हरिवंशराय बच्चन यांनी तेजी यांच्याशी लग्न केलं आणि दुसरीकडे समाजाचं वैर पत्करलं. जेव्हा हरिवंशराय त्यांच्या पत्नीसह अलाहबाद येथे पोहोचले तेव्हा सरोजिनी नायडू या पहिल्या व्यक्ती होत्या, ज्यांनी त्यांच्या या निर्णयात त्यांना साथ दिली होती, मोठी मदत केली होती. त्यांनीच बिग बींच्या वडिलांची ओळख पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी करून दिली. त्यावेळी 'कवी आणि त्यांच्या कवितांना भेटा...' असं म्हणत नायडू यांनी हरिवंशराय बच्चन यांची ओळख नेहरुंना करून दिली होती. बिग बींना आजही हा किस्सा आणि तो काळ घरातल्यांनी सांगितल्याप्रमाणं जसाच्या तसा लक्षात आहे.
स्वातंत्र्यसेनानी आणि कवयित्री अशी ओळख असणाऱ्या सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस अर्थात 13 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून उल्लेखला केला जातो. महिला हक्कांसाठीच्या लढ्यात सरोजिनी नायडू यांचं मोठं योगदान आहे. अशा या महान व्यक्तीच्या जन्मतिथीचा दिवस देशात राष्ट्रीय महिला दिन म्हणून ओळखला जातो.