पाकिस्तानी लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्याने सिद्धू वादाच्या भोवऱ्यात

सिद्धूंनी आमचा सल्ला घेतला असता तर आम्ही त्यांना पाकमध्ये जाऊच दिले नसते.

Updated: Aug 18, 2018, 01:24 PM IST
पाकिस्तानी लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्याने सिद्धू वादाच्या भोवऱ्यात title=

लाहोर: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. शपथविधी सोहळ्याच्या आधी सिद्धू यांनी आज पाकचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. याशिवाय, शपथविधी सुरु असताना सिद्धू पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या शेजारच्या आसनावर बसले होते. 

यावरुन सिद्धू यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. एक व्यक्ती आणि मंत्री म्हणून सिद्धू्ंचे हे वर्तन बेजबाबदारपणाचे आहे. याविषयी आता केवळ तेच स्पष्टीकरण देऊ शकतात. सिद्धूंनी आमचा सल्ला घेतला असता तर आम्ही त्यांना पाकमध्ये जाऊच दिले नसते.

ते मित्रत्वाच्या नात्यानं तिथं गेले आहेत. पण, मैत्री ही देशापेक्षा मोठी नाही. पाकिस्तानच्या गोळीबारात सीमेवर भारतीय जवान मारले जात आहेत. अशा परिस्थितीत सिद्धूंनी पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेणे अत्यंत चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते राशिद अल्वी यांनी व्यक्त केली.