नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानी हनुमान चालिसाचं (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार केलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलं. 13 दिवसांनी त्यांना जामीन मिळाल्यानंतर राणा दाम्पत्याने दिल्लीत जाऊन लोकसभा अध्यश्र ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि सर्व परिस्थितीची माहिती दिली.
त्यानंतर आज राणा दाम्पत्याने नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.इंग्रजांच्या काळात राजद्रोहाचं कलम देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले त्या महापुरुषांवर लावली होती. तेच कठोर कलम आमच्यावर लावण्यात आलं असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं.
हनुमान चालिसा वाचल्यामुळे अनेक संकटांपासून मुक्ती मिळते, महाराष्ट्रात आज अनेक संकट आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, लोडशेडिंग अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दशा झाली आहे. त्यातुन मुक्तता मिळाली पाहिजे यासाठी आम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं होतं. पण आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
पण सुप्रिम कोर्टाचे आम्ही आभार मानतो, आज सुप्रीम कोर्टाने त्या कायद्यावर स्थगिती दिली आहे. उद्धव ठाकरे इंग्रजांच्या कायद्याचं पालन हनुमान चालिसा वाचणाऱ्यांवर करत असाल तर ते राज्याचं दुर्देव असल्याची टीका रवी राणा यांनी केली.
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी हे सर्व केलं, कारण त्यांना कोणत्यातरी पदाची लालच देण्यात आली आहे. त्यांनी एका महिला खासदाराला अटक करुन पोलीस कोठोडीत ठेवलं. अशा प्रकारचं कृत्य केलं आहे त्याविरोधात पार्लमेंटच्या माध्यमातून खासदार नवनीत राणा न्याय मागणार आहे, अशी माहिती रवी राणा यांनी दिली.
शिवसेना नेते अनिल परब, संजय राऊत यांचे दहा फ्लॅट आहेत, भ्रष्टाचारातून मुख्यमंत्र्यांनी संपत्ती कमावली, आमचा एकच फ्लॅट मुंबईत आहेत त्याला मुंबई महापालिकेची सर्व मंजूरी आहे. इमारत झाल्यानंतर सात वर्षांनी आम्ही तो फ्लॅट खरेदी केला. आज पंधरा वर्षानंतर मुंबई महापालिकेची आम्हाला नोटीस केवळ मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर येत आहे,असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची लंका आहे. नवनीत राणा आणि रवी राणा आम्ही युद्धपातळीवर उतरु आणि भ्रष्टाचाराची ही लंका आहे ती भ्रष्टाचारापासून मुक्त करु अशी घोषणाही यावेळी रवी राणा यांनी केली.
तुरुंगात असताना नवनीत राणा यांनी पाठिच्या दुखण्याचा त्रास असल्याचं सांगितलं, पण जेल प्रशासन मुख्यमंत्र्याच्या दबावाखाली होतं, त्यामुळे जामीन झाल्यानंतर त्या लिलावती दाखल झाल्या. पण मुंबई महानगर पालिका लिलावती हॉस्पीटलला नोटीस देते ही दुर्भाग्यपूर्ण आहे.
नवनीत राणा यांचा हॉस्पीटलमधला एमआयआरचा फोटो समोर आल्यानतंर शिवसेना हॉस्पीटल प्रशासनाला धमक्या देतात. पण महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे ते सोडून लिलावतीला नोटीस दिली जात आहे. मुख्यमंत्री आपल्या पॉवरचा वापर करत आहे, असा आरोपही रवी राणा यांनी केला.
मोदींच्या नावाचा फोटो वापरुन शिवसेनेने खासदार आणि आमदार निवडून आणले. राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपच्या पाठित खंजीर खुपसला, तेव्हाच तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची हत्या केली. एका महिलेला जेलमध्ये टाकून उद्धव ठाकरे यांनी नामर्दांगीचं काम केलं आहे, बाळासाहेब जर हे पाहत असतील तर तेही दुखी झाले असतील की कोणाच्या हाता शिवसेनेचा कारभार गेला अशी टीकाही राणा यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे 14 तारखेला सभा घेणार आहात, त्याच दिवशी दिल्लीतल्या प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सदबुद्धी मिळाळी यासाठी आम्ही हनुमान चालिसा म्हणणार आहोत अशी घोषणा रवी राणा यांनी केली.