New Labor Codes:शिफ्टची कटकट नाही, लेटमार्कची झंझट नाही, घरातून पाहिजे तेव्हा करा काम, पंतप्रधानांचे संकेत

शिफ्टचं टेन्शन नाही, घरातून पाहिजे तेव्हा करा काम... काय आहे नवीन धोरण  

Updated: Aug 26, 2022, 06:20 PM IST
New Labor Codes:शिफ्टची कटकट नाही, लेटमार्कची झंझट नाही, घरातून पाहिजे तेव्हा करा काम, पंतप्रधानांचे संकेत title=

New Labor Codes: कोरोना काळात (Covid) गर्दी टाळण्यासाठी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची (Work From Home) पद्धत सुरु केली. देशात लॉकडाऊन (Lockdown) लागला आणि लोकांचं बाहेर जाणं बंद झालं. याचा परिणाम कंपन्यांच्या कामावर होऊ लागला. याला पर्याय म्हणून वर्क फ्रॉम सुरु करण्यात आलं. यामुळे लोकांच्या नोकऱ्याही वाचल्या आणि कंपनीच्या कामावरही परिणाम झाला नाही.

वर्क फ्रॉम होमचा सर्वाधिक फायदा झाला तो IT सेक्टर कंपन्यांना. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय आणि त्यामळे वर्क फ्रॉम होमची सुविधाही बंद होत चालली आहे. TCS सारख्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात येऊन काम करण्याच्या सूचना दिल्यात. अॅपल कंपनीही वर्क फ्रॉम होम बंद करण्याच्या तयारीत आहे. 

पण दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सूचनेनुसार या कंपन्यांना त्यांची रणनीती बदलण्याचा विचार करावा लागेल. मोदींच्या या सल्ल्यानंतर आता देशात नोकऱ्या करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे.

नोकरीची पद्धत बदलणार
देशात नवीन कामगार संहितेवर (New Labour Code) दीर्घकाळ काम सुरु आहे. मात्र अनेकवेळा मुदत उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनेमुळे कामगार संहितेत बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. कामगार संहितेनुसार कर्मचाऱ्यांना एका आठवड्यात 3 सुट्टी देण्याची तरतूद आहे. 

पण उर्वरीत चार दिवसात 12 तास काम करावं लागणार आहे. 12 तास काम आणि कार्यालयात येण्या-जाण्याची वेळ असे दिवसातले 14 ते 15 तास कर्मचाऱ्यांना घालवावे लागणार आहे. या समस्येपासून वाचण्यासाठी सरकार वर्क फ्रॉम होम पद्धतीला चालना देण्याचं काम करणार आहे. 

नोकरीचं स्वरुप बदलतंय
वर्क फ्रॉम होमचं समर्थन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले वर्क फ्रॉम होम, बदलत्या काळानुसार नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहे. वेगालने बदलणाऱ्या जगात याचा फायदा घेण्यासाठी आपल्यालाही त्याच वेगाने तयार राहावं लागेल.

4 दिवस 12 तास काम
ही प्रणाली कार्यान्वित झाल्यास कार्यालयातून काही तास आणि घरातून काही तास काम करून लोक दिवसातील कामाचे 12 तास पूर्ण करू शकतात. त्याचप्रमाणे, वर्क फ्रॉम होम करणारे 6-6 तासांच्या 2 शिफ्ट किंवा 4-4-4 तासांच्या 3 शिफ्टमध्ये काम करू शकतात. याद्वारे त्यांचे 12 तासही पूर्ण होऊ शकतात आणि सलग 12 तास काम करण्याचा ताण आणि थकवा जाणवणार नाही.

त्यानंतर 3 दिवसांची साप्ताहिक सुट्टी घेता येणार आहे. 3 दिवसांच्या सुट्टीमुळे कर्मचाऱ्याला पूर्ण आराम मिळू शकेल शिवाय तो पर्यटनाचा आनंदही घेऊ शकेल.

अर्थव्यवस्थेला मिळेल गती
3 दिवसांची सुट्टी कोणताही कर्मचारी साहजिकच घरी घालवणार नाही. तो चित्रपट, रेस्टॉरंट किंवा सहलीचं नियोजन करेल. यात तो जो खर्च करेल त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. कर्मचाऱ्याने 2 किंवा 3 दिवसांच्या सहलीचं नियोजन केलं तर पर्यटन व्यवसायालाही त्याचा फायदा होईल. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल.

मूनलाइटिंग पॉलिसीचा विचार
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या वर्क फ्रॉम होमच्या सल्ल्याबरोबरच मूनलाइटिंग पॉलिसीबद्दलही (Moonlighting Policy) चर्चा सुरु झाली आहे. मूनलाइटिंग पॉलिसी म्हणजे एका ठिकाणी काम केल्यानंतर उरलेल्या वेळ तुम्ही दुसरीकडे काम करु शकता. स्विगीने अलीकडेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मूनलाइटिंग पॉलिसी जाहीर केली.  swiggy मध्ये काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर दुसरीकडे दुसऱ्या कंपनीत काम करण्याचीही मुभा असेल. आपल्या कंपनीचं काम झालं कि हे कर्मचारी इतर कुठेही जॉब करू शकतील. त्यामुळे तीन दिवसांच्या सुट्टीत लोकं इतर ठिकाणी काम करुन अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.

मात्र मूनलाइटिंग पॉलिसीला काही कंपन्यांनी फारशी पसंती दाखवलेली नाही. कारण यामुळे कंपन्यांच्या गोपनीयतेचं उल्लंघन होऊ शकतं. याबाबत कोणताही कायदा नसल्याने कर्मचारी त्याच क्षेत्रातील कंपनीत काम करत आहे की नाही हे ठरवणं अवघड आहे.
---