मॉडेल दिव्या पाहुजा मर्डर प्रकरणी आता नवा खुलासा झाला आहे. क्राइम ब्रांचने नजफगढ मितराऊ येथे राहणाऱ्या मेघा नावाच्या एका तरुणीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी अभिजीने दिव्याच्या हत्येनंतर मेघाला 'द सिटी पॉईंट' हॉटेलात बोलावलं होतं. तिथेच दिव्याचा मृतदेह पडलेला होता. मेघाने अभिजीतला दिव्याचा आयफोन आणि पिस्तूल यासारखे पुरावे मिटवण्यास मदत केली होती.
मेघा पोर्टर नावाचं एक अॅप चालवत असल्याची माहिती क्राइम ब्रांचने दिली आहे. यादरम्यान ती अभिजीतच्या संपर्कात आली होती. अभिजीतचं ऐशआरामातील आयुष्य पाहून ती प्रभावित झाली आणि नंतर त्याची प्रेयसी झाली. हत्येनंतर अभिजीत सतत मेघाशी बोलत असल्याचं तपास समोर आल्याची माहिती क्राइम ब्रांचने दिली आहे. कधी फोन कॉल तर कधी व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून त्यांच्यात संभाषण होत होतं. त्यांच्यातील संवादाची संपूर्ण माहिती तपासात समोर आली आहे. क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मेघा हॉटेल 'द सिटी पॉईंट'ला पोहोचली तेव्हा रुम नंबर 111 मध्ये दिव्याचा मृतदेह पडलेला होता.
अभिजीत त्यावेळी फार घाबरलेला होता. त्याने मेघाला पैशांचं अमिष दाखवून पुरावे नष्ट करण्यास सांगितलं. यानंतर मेघाने अभिजीतला आयफोन आणि पिस्तूल यासारखे पुरावे नष्ट करण्यास मदत केली. मेघाच्या हत्येनंतर अटकेची कारवाई केली जात असतील तरी अद्याप पोलिसांना मृतदेह सापडलेला नाही. 2 जानेवारीला संध्याकाळी गुरुग्राम येथे द सिटी पॉइंट हॉटेलमध्ये मॉडेल दिव्या पाहुजाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी हॉटेल मालक अभिजीत सिंग, हेमराज आणि ओम प्रकाश नावाच्या तरुणाला अटक करत प्रकरणाचा खुलासा केला होता. एसआयटीने केलेल्या चौकशीत अभिजीतने सांगितलं होतं की, पुरावे मिटवण्यासाठी दिव्याचा आयफोन, आयकार्ड आणि हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल दिल्लीमधील रस्त्यावर फेकलं होतं. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दिव्याच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अभिजीतने हॉटेलच्या 2 कर्मचाऱ्यांना बीएमडब्ल्यू कारमधून पाठवलं होतं. पोलिसांना ही कार मिळाली आहे, पण त्यात मृतदेह सापडलेला नाही.