नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एस्सेल ग्रुपच्या वतीनं अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात योग आणि प्राणायामच्या सुविधेनं परिपूर्ण असं निसर्गोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यो वन या निसर्गोपचार केंद्राचं उद्घाटन करणार आहेत. एस्सेल समूहाचे शिल्पकार सुभाष चंद्रा यांच्या संकल्पनेतून हे केंद्र साकारलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर एस्सेल समूहानं अमेरिकेला खास भेट दिलीय... अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील कैट्सकिल्स पर्वतराजीतल्या निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी यो वन या निसर्गोपचार केंद्राची उभारणी करण्यात आलीय. यौवन या संस्कृत शब्दावरून या केंद्राचं नाव यो वन असं ठेवण्यात आलंय. तब्बल १४०० एकर जागेवर विविध प्रकारच्या वृक्षराजीनं नटलेल्या परिसरात २०० एकरामध्ये हे सुंदर केंद्र उभारण्यात आलंय... अमेरिकेतलं हे सर्वात मोठं नेचर क्युअर सेंटर आहे. भारताची प्राचीन जीवन पद्धती आणि ज्ञानाची अमेरिकेला ओळख करून देण्याचं स्वप्न एस्सेल समुहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी पाहिलं आणि अवघ्या ५ वर्षांत ते प्रत्यक्षात साकारलं देखील.
न्यूयॉर्क शहरापासून दीड तासांच्या अंतरावरील मॉन्टिसेलो भागात तब्बल २५ कोटी अमेरिकन डॉलर्स खर्च करून यो वनची उभारणी करण्यात आलीय... इथं योग, प्राणायाम यांचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जाईल. तसंच आयुर्वेद, नॅचरोपथी, हायड्रोपथी, फिजीओथेरपी आणि अॅक्युपंक्चर उपचारही दिले जातील. याचा लाभ घेणारे ताजेतवाने तर होतीलच, शिवाय त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढू शकते. यो वनमध्ये येणाऱ्यांना पोषण आहारासंबंधीच्या टिप्सही इथला प्रशिक्षित कर्मचारी वर्ग देईल. स्थूलपणा हा अमेरिकेतला सध्या सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. लठ्ठपणा कसा टाळावा, काय उपचार घ्यावेत याची माहिती इथं देण्यात येईल. इथं तीन दिवसांपासून दहा दिवसांपर्यंतचे विविध कोर्स उपलब्ध असतील. इथं उभारण्यात आलेल्या १३१ दालनांमध्ये विविध उपचार पद्धतींसाठी आवश्यक खास उपकरणं आणि तज्ज्ञ उपलब्ध असतील. त्याशिवाय पाच हजार चौरस फुटांचा जलतरण तलाव, खास वॉकवे आणि पौष्टिक भोजनाची सोय उपलब्ध असणाराय. सुभाष चंद्रा यांच्या या अनोख्या संकल्पनेचं कौतुक न्यूयॉर्क राज्याच्या विधानसभेनं केलं असून, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांचा खास सन्मान करण्यात आला.
यो वनमुळं न्यूयॉर्कमधील या दुर्लक्षित भागात सुमारे ५०० जणांना थेट, तर जवळपास दीड हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. २०१४ मध्ये आपल्या पहिल्याच अमेरिका दौऱ्यात न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणात भारतातील योगाच्या ५ हजार वर्षं जुन्या परंपरेचा गौरव केला होता. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा, असा प्रस्तावही त्यांनी ठेवला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या चौथ्या वर्षीच न्यूयॉर्कमध्ये यो वनचं उद्घाटन होतंय. धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात निरोगी आयुष्य कसं जगावं, याचे धडे अमेरिकन नागरिकांना यो वनमध्ये गिरवता येणार आहेत. स्वस्थ मन आणि निरोगी काया यांचं ज्ञान देणारी प्राचीन भारतीय जीवनपद्धती अंगिकारण्याची संधी यानिमित्तानं अमेरिकन नागरिकांना मिळणार आहे.