Married Couple Deadbody Found In Room: मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या जोडप्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दोघांच्या आकस्मात मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. पती-पत्नीचा एकत्र मृत्यू झाल्यामुळं अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यात धक्क्दायक सत्य समोर आलं आहे.
उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये लग्नाच्या ४८ तासांच्या आतच जोडप्याचा मृत्यू झाला होता. प्रताप यादव आणि पुष्पा यादव असं पती-पत्नीचे नाव होते. ३० मे २०२३ रोजी दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतर मोठ्या धुमधडाक्यात लग्नाची वरात आली होती. कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले होते. रात्री उशीरापर्यंत लग्नानंतरचे विधी सुरू होते. त्यानंतर दोघेही जेवण करुन मधुचंद्रासाठी त्यांच्या खोलीत गेले.
मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या दोन्ही जोडप्याचा दुसऱ्या दिवशी बिछान्यावर मृतदेह सापडला होता. त्यामुळं एकच खळबळ उडाली होती. सकाळ होऊन बराच वेळ झाला तरी जोडप्याच्या खोलीचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळं घरच्यांनी त्यांचे दार ठोठावून पाहिले. मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. अखेर प्रतापच्या लहान भावाने खिडकीचे गज तोडून त्यांच्या खोलीत प्रवेश केला.
खोलीत जाताच त्याने दोघांनाही बिछान्यावर मृतावस्थेत असल्याचे पाहिले. त्याने तातडीने कुटुंबीयांना याची माहिती दिली. पोलिसांनाही याप्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. तसंच, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सुरुवातीला दोघांचे कुटुंबीय मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी समजवल्यानंतर त्यांनी संमती दिली. अचानक झालेल्या या घटनेमुळं गावात एकच चर्चा रंगली होती. नवीनच लग्न झालेल्या जोडप्याचा असा मृत्यू झाल्याने हळहळही व्यक्त करण्यात येत होती.
या प्रकरणी दोघांचेही पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आले आहे. एसपी प्रशांत वर्मा यांनी दिलेल्या माहितीनपसार पती-पत्नीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. शनिवारी नवदाम्पत्य प्रताप आणि पुष्पा यांना एकत्र मुखाग्नी देण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी दोघांचे मृतदेह सापडले होते. तिथे वोमेट (उलटी) केली होती. त्यामुळं दोघांचाही मृत्यू विष बाधेने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला होता. मात्र, आता पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे.