Rameshwaram Cafe Blast: राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून 2 प्रमुख संशयितांना अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, मुसावीर हुसेन शाजीब याने रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता आणि अदबुल मतीन ताहा हा स्फोटाच्या नियोजन आणि अंमलबजावणीचा मास्टरमाईंड होता. या स्फोटात 9 लोक जखमी झाले होते.  

शिवराज यादव | Updated: Apr 12, 2024, 11:52 AM IST
Rameshwaram Cafe Blast: राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून 2 प्रमुख संशयितांना अटक title=

बंगळुरुतील रामेश्वर कॅफे स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने दोन फरार आरोपीना अटक केली आहे. कोलकाताजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. 1 मार्चला झालेल्या या स्फोटात 9 लोक जखमी झाले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, मुसावीर हुसेन शाजीब याने रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता आणि अदबुल मतीन ताहा हा स्फोटाच्या नियोजन आणि अंमलबजावणीचा मास्टरमाईंड होता. या स्फोटात 9 लोक जखमी झाले होते.

एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब हे दोन्ही प्रमुख संशयित फरार होते. ते दोघे कोलकातापासून जवळ एका ठिकाणी लपल्याची माहिती आम्हाला मिळाली. यानंतर एनआयएने त्यांना अटक केली. 12 एप्रिल रोजी पहाटे एनआयएने खोट्या नावाखाली लपलेल्या आरोपींना बेड्या ठोकल्या".

मागच्या महिन्यात एनआयएने मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब या दोघांचे फोटो जारी केले होते. यावेळी त्यांच्यावर 10 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. "शाजिबने आईडी ठेवला होता. तर ताहा या स्फोटाचा कट रचणारा मुख्य सूत्रधार होता. त्याने कायद्याचं उल्लंघन केलं आहे". 

अटकेची कारवाई करण्यासाठी एनआयएने केंद्रीय गुप्तचर यंत्रणा यांच्यासह पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळच्या स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली. एनआयएने आरोपींचा शोध घेण्यासाठी तब्बल 300 कॅमेऱ्यांची पडताळणी केली. यानंतर आयसीसचे सदस्य शाजिब आणि ताहा यांनीच हा स्फोट घडवून आणल्याचं उघड झालं. हे दोघेही 2020 पासून आयसीसच्या रडारवर आहेत. 

“एनआयएने या प्रकरणात आणखी दोघांचा आरोपी म्हणून उल्लेख केला आहे. त्यापैकी एकाचं नाव माज मुनीर अहमद (26) आहे, तो घटनेच्या वेळी तुरुंगात होता. दुसऱ्याचं नाव मुझम्मिल शरीफ (30) आहे. त्याला 27 मार्च रोजी एनआयएने सेलफोन, बनावट सिम कार्ड आणि स्फोटाची योजना आखण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी वापरली जाणारी इतर सामग्री पुरवल्याबद्दल अटक केली होती,” असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

तपासादरम्यान ताहाने हा कट यशस्वी करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केल्याचं समोर आलं. ताहाने 1 मार्चच्या कॅफे स्फोटासाठी लॉजिस्टिकची व्यवस्था करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी मुझम्मील शरीफला हस्तांतरित करण्यासाठी भारताच्या विविध भागांमध्ये चोरलेल्या ओळखी आणि आयएसआयएस कारणांसाठी भरती केलेल्या लोकांच्या ओळखपत्रांसह विविध साधनांचा वापर केला होता असंही अधिकाऱ्याने सांगितलं.