नवी दिल्ली : सलग ९-१० वर्ष तुमचा पगार वाढलाच नाही, तर तुम्ही काय कराल... तुम्हाला नक्कीच नैराश्य येईल. पण देशात एक व्यक्ती अशी आहे, की २००८ सालापासून त्यांचा पगारच वाढलेला नाही... आम्ही बोलतोय भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याबद्दल... त्यांच्याच विनंतीवरून गेल्या १० वर्षांपासून ते एकाच पगारावर 'रिलायन्स इंडस्ट्रीज'मध्ये काम करतायत.
अर्थात हा पगार तुमच्या-आमच्यासारखा हजार किंवा लाखांत नाही... तर तो आहे कोट्यवधींमध्ये... रिलायन्सनं नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक ताळेबंदात मुकेश अंबानी यांचा पगार १५ कोटी रुपयांवर कायम असल्याचं जाहीर केलंय.
इतर भत्ते पकडून वर्षाला त्यांना मिळणारी रक्कम होते केवळ २४ कोटी... कर्मचाऱ्यांसमोर उदाहरण घालून द्यायचं, म्हणून त्यांनी स्वतःचा पगार वाढवून न घेण्याचा निर्णय घेतलाय म्हणे... अर्थात रिलायन्सच्या इतर संचालकांना मात्र पगारवाढ मिळाली आहे.
मुकेश अंबानी यांचे चुलत बंधू निखिल मेसवानी आणि हितल मेसवानी यांचा पगार आता १ कोटींच्या वाढीसह २० कोटी ५७ लाख झालाय. २०१४-२५ सालच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे.
- वेतन भत्ते : ४.४५ करोड रुपये
- कमिशन : ९.५३ करोड रुपये
- अतिरिक्त सुविधा : ३१ लाख रुपये
- रिटायरमेंट लाभ : ७१ लाख रुपये
एकूण : १५ कोटी रुपये
सोबतच मुकेश अंबानी यांची पत्नी आणि अकार्यकारी व्यवस्थापक नीता अंबानी यांना सिटिंग फी म्हणून ७ लाख रुपये आणि कमिशन म्हणून १.६५ करोड रुपये मिळालेत. २०१७-१८ मध्ये हा आकडा ६ लाख आणि १.५ करोड रुपये इतका होता.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या सलग १० वर्षांपासून पगारवाढ न होताही रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानींचं नाव जगातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या क्रमांकावर समाविष्ट आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्याकडे ५४ अरब डॉलरची संपत्ती आहे.