'राष्ट्रपतींनी मोदींना दही-साखर भरवणं हे लोकशाही संविधान मानणाऱ्यांना..'; राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut On President Murmu Feeding PM Modi Curd Sugar: संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत अनेक गोष्टींवर आक्षेप घेतानाच राष्ट्रपतींच्या एका कृतीवरुनही टीका केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 23, 2024, 08:23 AM IST
'राष्ट्रपतींनी मोदींना दही-साखर भरवणं हे लोकशाही संविधान मानणाऱ्यांना..'; राऊत स्पष्टच बोलले title=
राऊत यांनी नोंदवला आक्षेप

Sanjay Raut On President Murmu Feeding PM Modi Curd Sugar: उद्धव ठाकरे गटाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. 'सामना'मधील 'रोखठोक' या सदरामधून निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केल्याने भारतीय जनता पार्टीला 240 जागांपर्यंत मजल मारता आली. अगदी शेवटच्या फेरीत लागलेल्या अनेक मतदारसंघांमधील निकालांबद्दल शंका घेण्यास वाव आहे असा दावा करताना निवडणूक आयोगाने भाजपाची पाठराखण केली नसती तर त्यांना केवळ 110 जागा मिळाल्या असत्या आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नसते असा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी आपल्या लेखामधून देशाच्या राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना दही-साखर भरवण्याच्या कृतीवरही आक्षेप घेतला आहे.

60 ते 70 ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे

"2024 च्या निवडणुकीत भारताच्या निवडणूक आयोगाचे वर्तन सरळ पक्षपाती होते. भाजपची घोडदौड 110 ते 120 वरच थांबणार होती. आयोगाच्या पक्षपातामुळे 240 चा आकडा गाठता आला. कुंपणानेच शेत खाल्ले असेच हे घडले. नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्प मतात आला व दोन कुबड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले. मुंबईसह देशात किमान 60 ते 70 ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवले. तसे झाले नसते तर भाजप 110 ते 120 पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नसते. या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे," असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

पडद्यामागून सूत्रे हलवली नसती तर...

"मतदारांनी मोदी व शहांना बहुमत मिळू दिले नाही. निवडणूक आयोगाने पडद्यामागून सूत्रे हलवली नसती तर भाजपच्या आणखी किमान 100 जागा कमी झाल्या असत्या व जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा विजय झाला असता. भारताच्या निवडणूक आयोगाने ते घडू दिले नाही असे एकंदरीत दिसते," अशी टीका राऊत यांनी केली आहे.

राष्ट्रपतींनी दही-साखर भरवल्यावरुन टीका

"निवडणूक आयोगाने संविधानाने नेमून दिलेले कर्तव्य पालन केले नाही, तसे भारतीय संविधानाच्या रखवालीची जबाबदारी असणाऱ्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकशाहीतील सर्व संकेतांचा भंग केला. मोदी हे सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले तेव्हा राष्ट्रपती मुर्मू या आनंदित झाल्या व दही-साखरेची वाटी घेऊन पुढे आल्या. त्यांनी मोदी यांना ’दही-साखरे’चा घास भरवला. हे चित्र लोकशाही संविधान मानणाऱ्यांना विचलित करणारे आहे. मोदींनी दही-साखर गपकन गिळली. जणू लोकशाहीच गपकन गिळावी तशी," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

काठावर असलेल्या जागांबद्दलही शंका

"देशभरातील निकाल पाहता 500 ते 1000 मतांच्या फरकाने भाजपने 130 च्या आसपास जागा जिंकल्या. या विजयावर संशय आहे. कमी फरकाने जिंकलेल्या जागांवर मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्यांत घोटाळे झाले व अशा जागांवर अमित शहांचे विशेष लक्ष होते. ज्या जागा काठावर आहेत त्या अशा पद्धतीने खेचून आणायच्या योजना जणू आधीच ठरल्या होत्या. 500-1000 चे मताधिक्य लोकसभेत नगण्य आहे. म्हणजे भाजप केवळ 110 जागांवरच जिंकला आहे," असंही राऊत यांनी या लेखात म्हटलं आहे.

कुंपणाने शेत गिळले

लेखाच्या शेवटी, "भारतीय संविधान व लोकशाहीचे रखवालदारच घोटाळे करीत आहेत. कुंपणच शेत खात आहे. नव्हे कालच्या निवडणुकीत कुंपणाने शेत गिळले," असं म्हणत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर राऊतांनी आक्षेप घेतला आहे.