Odisha Train Accident : ओडिशामधील बालासोर जिल्ह्यामध्ये झालेल्या अपघाताने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. या तिहेरी रेल्वे अपघाताने अनेकांची कुटुंबे उद्धवस्त केली आहेत. 2 जून रोजी कोरोमंडल एक्सप्रेसला (Coromandel Express) झालेल्या भीषण अपघातात 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहे. कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघातग्रस्त डब्ब्यांना दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसने (Bengaluru-Howrah Superfast Express) धडक दिल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या अपघातानंतर मृतांचा खच पडला होता. मात्र यातील 40 मृतदेह हे असे होते ज्यांच्या शरीरावर एकही जखम आढळली नाही. तपासानंतर वीजेच्या धक्क्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये मरण पावलेल्यांमध्ये अनेक लोक असे आहेत ज्यांना कोणतीही बाह्य दुखापत झाली नव्हती. बचाव कार्यात सहभागी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, किमान असे 40 मृतदेह आढळले आहेत ज्यांना बाह्य जखमा नाहीत. त्यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याची शक्यता आहे. ओव्हरहेड केबल ट्रेनवर पडल्यानंतर त्यामध्ये करंट डब्ब्यामध्ये पसरला असावा.
नक्की काय घडलं?
जीआरपीने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. जीआरपीने आयपीसी कलम 304 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रेनच्या बोगीवर लो टेन्शन लाईन पडल्याने विद्युत प्रवाह पसरला. कोरोमंडल एक्सप्रेस बेंगळुरू-हावडा एक्सप्रेसला धडकल्यानंतर केबल तुटल्याची शक्यता आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एकीकडे अनेक मृतदेह होते ज्यांची ओळख पटत नव्हती, तर जवळपास 40 मृतदेह होते ज्यांच्यावर कोणत्याही जखमेच्या खुणा नव्हत्या. त्यांच्या रक्ताचा एक थेंबही सांडला नाही. विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ईस्ट कोस्ट रेल्वेचे चीफ ऑपरेशन मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झालेले पूर्ण चंद्र मिश्रा म्हणाले की, बोगीला जेव्हा केबलचा स्पर्श झाला तेव्हा विद्युत प्रवाह पसरला होता. त्यामुळे काही सेकंदातच त्यांचा मृत्यू झाला.