Offbeat News : असं म्हणतात की प्रेम (Love) आंधळ असतं. प्रेमात गरीब-श्रीमंत, जात-पात इतकंच काय तर वयही पाहिलं जात नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरुणीचं प्रियकराच्या वडिलांवरच जीव जडला. हे प्रकरण इतकं पुढे गेलं की दोघंही घर सोडून पळून गेले. दोघांच्या कुटुंबियांनी त्यांचा भरपूर शोध घेतला. पोलिसात तक्रारही करण्यात आली. पण तब्बल एक वर्षांनंतर हे दोघंही दिल्लीत सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
तुझ्यात जीव रंगला
उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये (Uttarpradesh) राहाणाऱ्या वीस वर्षांच्या तरुणीचं अमित नावाच्या मुलावर प्रेम होतं. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. त्यांनी लग्नाच्या आणा-भाकाही घेतल्या. पण एक दिवस ती तरुणी अचानक गायब झाली. विशेष म्हणजे त्याच दिवशी मुलाचे वडिलही फरार झाले. अमित आणि तरुणीच्या कुटुंबियांनी दोघांचाही शोध सुरु केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी प्रियकर अमितला भेटण्यासाठी नेहमी त्याच्या घरी जात होती. याच दरम्यान अमितचे वडिल कमलेश यांच्याशीही तिचं बोलणं होत होतं. या बोलण्यातूनच दोघांचे प्रेमसंबंध जुळले. याचा अमितला थांगपत्ताच नव्हता. अमितच्या नकळत दोघांच्या भेटी-गाठी सुरु झाल्या आणि गेल्या मार्च महिन्यात ते दोघंही घरातून फरार झाले. बऱ्याच शोधानंतरही दोघंही सापडत नसल्याने पोलीस ठाण्यात ते गायब असल्याची तक्रार करण्यात आली.
पोलिसांकडून शोध सुरु
कुटुंबियांकडून तक्रार आल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला. इतर राज्यातील पोलिसांनाही दोघांबद्दल माहिती देण्यात आली. दोघांच्याही मोबाईलचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं. तब्बल वर्षभराच्या शोधानंतर दोघंही दिल्लीत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर पोलिसांनी कमलेश आणि त्या तरुणीला ताब्यात घेतलं. दोघांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चेन स्नॅचर बॉडिबिल्डरला अटक
दुसऱ्या एका घटनेत आंध्र प्रदेश पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी एका बॉडीबिल्डरला अटक केली, तो आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन चेन स्नॅचिंग करत होता. विशेष म्हणजे त्या बॉडिबिल्डरने मिस्टर आंध्रप्रदेशचा खिताब पटकावला आहे. चेन स्नॅचिंगच्या अनेक तक्रारी वाझल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने त्याचा तपास सुरु केला. आरोपी तिरुपती, विजयवाडा, कडप्पा या ठिकाणी चेन स्नॅचिंग करायचे. तब्बल 32 गुन्हे त्यांच्यावर दाखल होते. तसंच कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्येही दुचाकी चोरीच्या पाच तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
सैयद बाशा असं आरोपीचं नाव असून तो बॉडिबिल्डर आहे. सैय्यद बाशाने 2022 मध्ये मिस्टर आंध्रचा खिताब पटाकला होता. त्याआधी 2021 मध्ये तो कुवैतमध्ये कॅब चालवत असे. पण कोरोनामुळे त्याला पुन्हा भारतात यावं लागलं. त्यानंतर त्याने मित्राच्या मदतीने चेन स्नॅचिंगला सुरुवात केली.