Okinawa EV Dealership Catches Fire In Mangalore: इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अलीकडेच मुंबईत टाटा नेक्सॉन इव्हीला आग लागली होती. आता इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या ओकिनावाच्या मंगळुरू येथील डीलरशिपमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एकूण 34 इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाल्या आहेत.
ही दुर्दैवी घटना शुक्रवारी 24 जून रोजी सकाळी घडली. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे कंपनीने सांगितलं आहे. ओकिनावा डीलरशिप जळून राख होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी एप्रिलमध्ये तमिळनाडूमध्येही ओकिनावा इव्ही डीलरशिपला आग लागली होती. त्यानंतरही आउटलेटमध्ये इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात आलं होतं. ओकिनावाने मंगळुरूच्या घटनेबद्दल सांगितले की, 'मंगळुरूमधील आमच्या एका शोरूममध्ये आगीची दुर्दैवी घटना घडली आहे. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे व्यापाऱ्याने सांगितले. आम्ही डीलरशीपच्या संपर्कात आहोत आणि आवश्यक ती सर्व मदत करत आहोत.'
"आम्ही खात्री देऊ इच्छितो की देशभरातील आमच्या डीलरशिपमध्ये सुरक्षेची सर्वोच्च काळजी घेतली जाते," असे ओकिनावाने निवेदनात म्हटले आहे. मंगळुरू आणि तामिळनाडूतील घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यापूर्वी वेल्लोरमध्ये ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता.