देशाला सक्षम विरोधी पक्षाची गरज- बॅनर्जी

अर्थव्यवस्थेच्या समस्येतून आपण लवकर बाहेर पडू असं वाटत नाही. त्यासाठी दीर्घळाळ लागेल.

Updated: Jan 27, 2020, 08:47 AM IST
देशाला सक्षम विरोधी पक्षाची गरज- बॅनर्जी title=

जयपूर: देश चालवणाऱ्या सरकारवर वचक ठेवायचा असेल तर सक्षम विरोधी पक्षाची गरज असते. मात्र, सध्याच्या घडीला देशात असा मजबूत विरोधी पक्ष दिसत नसल्याचे मत नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले. ते रविवारी जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये ते बोलत होते. 

यावेळी त्यांनी म्हटले की, सध्या विरोधी पक्ष विविध गटांमध्ये विभागलेले आहेत. त्यामुळे सरकारवर विरोधकांचा दबाव येत नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीचे ह्रदय असलेल्या आणि सत्ताधारी पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या सक्षम विरोधी पक्षाची भारताला गरज आहे. सत्ताधारी पक्षानेही याची काळजी घेतली पाहिजे, असे बॅनर्जी यांनी म्हटले. 

यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवरही यावेळी बॅनर्जी यांनी भाष्य केले. अर्थव्यवस्थेच्या समस्येतून आपण लवकर बाहेर पडू असं वाटत नाही. त्यासाठी दीर्घळाळ लागेल. अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल इतका पैसा सध्या आपल्याकडे नाही. बँकिंग सेक्टरमध्येही पैसा लावू शकू, अशी आपली परिस्थिती नाही. पण, अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देशवासियांना धर्म आणि जातीच्या आधारे मतदान न करण्याचे आवाहनही केले.

याशिवाय, देशातील शिक्षणव्यवस्था कशी असावी, याबाबतही त्यांनी विचार मांडले. लांना प्रत्येक विषय समजत नसतो. ज्या विषयात त्यांना रुची आहे, तोच विषय त्यांना समजत असतो. त्यामुळे मुलांना समजतं तेच शिकवलं पाहिजे. चौथीच्या मुलांना समाजशास्त्र शिकवून चालणार नाही. कारण समाजशास्त्रासाठी वाचन खूप करावे लागते. त्यामुळे मुलांचा वाचनात रसच नसेल तर माहिती नसलेल्या भाषेतील सिनेमा पाहताना जी अवस्था होते, तशीच या मुलांची अवस्था होते, याकडे बॅनर्जी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.