Opposition Meeting: मोदी विरोधकांची वज्रमूठ आज पाटण्यात (Patna) पाहायला मिळाली. देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांची (Opposite Parties) बैठक आज संपन्न झाली. नितीश कुमारांनी (Nitish Kumar) बोलावलेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी (Rahul Gandhi), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन एकत्र आहेत. 2024च्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. विरोधकांची पुढची बैठक सिमल्यामध्ये होणार आहे. त्यामध्ये जागावाटपावर चर्चा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकजूट राखवण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावर जवळपास सर्व विरोध पक्षांनी सहमती दर्शवली असून पुढची बैठक 12 जुलैला शिमला इथं होणार आहे. या बैठकीत निर्णायक चर्चा केली जाणार आहे. आजच्या बैठकीसाठी देशभरातील 15 विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. यात ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल. भगवंत मान, एमके स्टॅलिन यांच्यासहित सहा राज्यांचे मुख्यमंत्री, तसंच उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, महबूबा मुफ्ती यांच्यासहित 5 राज्यांचे माजी मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी देखील बैठकीला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे आजारातून बरं झाल्यानंतर लालू प्रसाद यादव पहिल्यांदाच या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत 2024 लोकसभा निवडणूक आणि भाजपला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी रणनिती आखण्यावर चर्चा झाली.
बैठकीनंतर विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या पत्रकार परिषेदला संबोधित करताना सर्वांनी एकत लढण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सत्तेत असलेलं सरकार देशहितासाठी काम करत नसल्याची टीका यावेळी करण्यात आली.
अजेंडा तयार करणार
12 जुलैच्या बैठकीत सामान्य अजेंडा तयार होईल, प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणात सांगितलं. तर राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला. ही विचारधारेची लढाई असून सर्व एकत्र असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. यापुढे एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एकत्र लढण्यावर सहमती दर्शवली. आपली लढाई ही विरोधी पक्षांची लढाई नसून भाजपाच्या तानाशाही आणि त्यांच्या काळ्या कायद्यांविरोधातली ही लढाई असल्याचं म्हटलं आहे.
बैठकीत 27 नेते सहभागी
पटणात होणाऱ्या या महाबैठकीत 15 पक्षांचे सत्ताविस नेते सहभागी झाले होते. यात नीतीश कुमार (जेडीयू), ममता बनर्जी (एआईटीसी), एमके स्टालिन (डीएमके), मल्लिकार्जुन खड़गे (कांग्रेस), राहुल गांधी (कांग्रेस), अरविंद केजरीवाल (आप), हेमंत सोरेन (झामुमो), उद्धव ठाकरे (एसएस-यूबीटी), शरद पवार (एनसीपी), लालू प्रसाद यादव (राजद), भगवंत मान (आप), अखिलेश यादव (सपा), केसी वेणुगोपाल (काँग्रेस), सुप्रिया सुळे (एनसीपी), मनोज झा (राजद), फिरहाद हकीम (एआईटीसी), प्रफुल्ल पटेल (एनसीपी), राघव चड्ढा (आप), संजय सिंह (आप), संजय राऊत (शिवसेना-यूबीटी), ललन सिंह (जेडीयू), संजय झा (राजद), सीताराम येचुरी (सीपीआईएम), उमर अब्दुल्ला (नॅकां), टीआर बालू (डीएमके), महबूबा मुफ्ती (पीडीपी), दीपंकर भट्टाचार्य (सीपीआईएमएल), तेजस्वी यादव (राजद), अभिषेक बनर्जी (एआईटीसी), डेरेक ओ'ब्रायन (एआईटीसी), आदित्य ठाकरे (शिवसेना-यूबीटी) आणि डी राजा (सीपीआई).